Preity Zinta Bollywood Comeback: बॉलिवूडची ‘डिम्पल गर्ल’ अशी ओळख मिळवणारी अभिनेत्री प्रीती झिंटा लग्नानंतर मनोरंजन विश्वापासून काहीशी दूर गेली होती. मात्र, आता अनेक वर्षांच्या मोठ्या ब्रेकनंतर अभिनेत्री पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर परतण्यासाठी सज्ज झाली आहे. लवकरच प्रीती झिंटा एका बॉलिवूड चित्रपटात मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता सनी देओल असणार आहे. चाहते आता या चित्रपटासाठी खूप उत्सुक झाले आहेत.
गेलं वर्ष अभिनेता सनी देओलसाठी खूप धमाकेदार ठरलं. 'गदर २' ने बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली होती. यानंतर आता सनी देओलच्या आगामी चित्रपटांची देखील सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे. सध्या अभिनेता त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्याच्या हातात सध्या अनेक चित्रपट आहेत. त्यातील एक 'लाहोर १९४७' नावाच्या चित्रपटात सनी देओलसोबत प्रीती झिंटा झळकणार आहे. या चित्रपटाबाबत सातत्याने नव्या अपडेट्स समोर येत आहेत. या चित्रपटात आमिर खान कॅमिओ भूमिकेत दिसणार असल्याचे देखील नुकतेच समोर आले आहे.
अभिनेता आमिर खान स्वतः 'लाहोर १९४७' या चित्रपटाची निर्मिती करत आहे. या चित्रपटात सनी देओल मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मात्र, आता अभिनेत्री प्रीती झिंटा देखील त्याच्यासोबत काही फोटोंमध्ये दिसली आहे. मीडिया रिपोर्ट नुसार, अभिनेत्री प्रीती झिंटा तब्बल ६ वर्षांनंतर या चित्रपटाद्वारे पुनरागमन करणार आहे. अभिनेत्री प्रीती झिंटा नुकतीच मुंबईतील एका स्टुडिओमधून बाहेर पडताना दिसली. लूक टेस्टसाठी प्रिती झिंटा तिथे पोहोचली होती, असे बोलले जात आहे. सनी देओलच्या 'लाहोर १९४७'साठी तिने लूक टेस्ट दिल्याचं म्हटलं जात आहे. या चित्रपटातून ती बॉलिवूडमध्ये धमाकेदार पुनरागमन करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सनी देओलला हा चित्रपट 'गदर २'च्या यशानंतर मिळाला आहे. सनी देओलने 'कॉफी विथ करण ८'च्या एपिसोडदरम्यान याचा खुलासा केला होता. तो म्हणालेला की, 'गदर २' च्या सक्सेस पार्टीदरम्यान आमिर खान त्याच्याकडे आला आणि त्याला भेटायला बोलावले. दुसऱ्या दिवशी दोघांची भेट झाली आणि या नव्या प्रोजेक्टवर चर्चा सुरू झाली. तर, सनी देओलने चित्रपटाला लगेच होकार दिला. 'लाहोर १९४७' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटासाठी मुंबईत काम सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यावेळची कथा दाखवण्यासाठी भव्यदिव्य सेट उभारले जात आहेत.