गेल्या अनेक दिवसांपासून ‘अहो विक्रमार्का’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटात मराठी चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेते प्रवीण तरडे आणि तेजस्वीनी पंडीत महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. तसेच दाक्षिणात्य सुपस्टार देव गिल या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करत आहे. त्यामुळे सगळीकडे या चित्रपटाची चर्चा सुरु होती. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
‘अहो विक्रमार्का’ या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अॅक्शन, इमोशन्स आणि ड्रामा अशा सगळा मसाला पाहायला मिळत आहे. परिस्थितीशी दोन हात करण्याची जिद्द असलेल्या एका धडाकेबाज पोलिस अधिकाऱ्याची कहाणी या चित्रपटात दाखवणात आली आहे. ‘अहो विक्रमार्का’ या चित्रपटात देव गिल पोलिस अधिकाऱ्याच्या जबरदस्त भूमिकेत पहायला मिळणार आहे. अभूतपूर्व साहस, जाज्वल्य देशाभिमान दाखवत पोलिसांच्या शौर्याला, खाकी वर्दीतल्या हिरोंना सलाम करणारा ‘अहो विक्रमार्का' हा चित्रपट आहे. धडाकेबाज अॅक्शनसीन, नायक नायिका यांच्यातील फुलणारं प्रेम आणि कुटुंबामधील प्रभावी नाट्य अशा त्रिसूत्रीवर आधारलेला रोमँटिक आणि अॅक्शनचे परफेक्ट कॉम्बिनेशन असलेला ‘अहो विक्रमार्का’ हा मल्टीस्टारर चित्रपट प्रेक्षकांचे जबरदस्त मनोरंजन करेल.
‘अहो विक्रमार्का’ या चित्रपटात प्रवीण तरडे थोड्या वेगळ्या अंदाजात दिसत आहेत. ते खलनायकाच्या भूमिकेत दिसत आहेत. त्यांचा ट्रेलरमधील लूक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. तसेच 'असूर आहे मी राक्षसांचा राजा' हा त्यांचा डायलॉग लक्षवेधी ठरत आहे. त्यासोबतच अभिनेत्री तेजस्विनी पंडीत देखील वेगळ्या रुपात दिसत आहेत. तिचा लूकदेखील पाहण्यासारखा आहे. एकंदरीत चित्रपटाचा ट्रेलर पाहाता चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळत आहे.
वाचा: 'पब्लिसिटी स्टंट', अरशद वारसीने प्रभासला जोकर म्हटल्याने दाक्षिणात्य कलाकार संतापले
'अहो विक्रमार्का’ चित्रपटसृष्टीतील पहिला मराठी ब्लॉकबस्टर-पॅन इंडिया चित्रपट ५ भाषांमध्ये ३० ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. मराठीसाठी काहीतरी करण्याच्या उद्देशाने ‘अहो विक्रमार्का’ या भव्य चित्रपटाच्या निर्मितीची धुरा देवने सांभाळली आहे. सयाजी शिंदे, प्रवीण तरडे, तेजस्विनी पंडित, अनिल नगरकर अशा अनेक मराठी कलाकार या चित्रपटात देवसोबत दिसणार आहेत. ‘हा चित्रपट मी माझ्या आईसाठी बनवला असल्याचे सांगताना हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करेल असा विश्वास त्याने ट्रेलर लाँच प्रसंगी व्यक्त केला. मूळचा पुण्याच्या असलेल्या देवला मराठी भाषा तिथली संस्कृती याचा नितांत आदर आहे.