‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डाने केले आहे. तसेच या चित्रपटात तो स्वत: मुख्य भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केलेली नाही. पण या चित्रपटासाठी अनेक कलाकार पोस्ट करताना दिसत आहेत. नुकताच मराठमोळे अभिनेते प्रवीण तरडे यांनी या चित्रपटासाठी केलेली पोस्ट चर्चेत आहे.
प्रवीण तरडेंनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. हे पोस्टर शेअर करत ‘॥ धर्मो रक्षति रक्षित:॥ अफाट अचाट आयुष्य जगलेल्या, जातीपातीला गाडण्यासाठी झटलेल्या, महान व्यक्तीमत्वाची प्रेरणादायी गोष्ट. ताबडतोब बघावा असा तडाखेबंद सिनेमा,’ असे कॅप्शन दिले आहे. सोशल मीडियावर प्रवीण तरडेंची ही पोस्ट तुफान व्हायरल झाली आहे. अनेकांनी कमेंट करत हा चित्रपट पाहण्याचा सल्ला दिला आहे.
वाचा: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिता खरातनं होळीनिमित्त घेतला खास उखाणा, पाहा व्हिडीओ
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटासाठी रणदीप हुड्डाने प्रचंड मेहनत घेतली आहे. त्याने जवळपास ३० किलो वजन कमी केले. त्याच्या या बॉडी ट्रान्सफॉर्मेशनचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. सर्वात आधी या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर करणार होते. मात्र, काही मतभेद झाल्यामुळे त्यांनी चित्रपटातून काढता पाय घेतला. त्यानंतर रणदीपने दिग्दर्शनाची धुरा सांभाळली.
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट २२ मार्च रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्या दोन दिवशी जेमतेम कमाई केली. पहिल्या दिवशी १.०५ कोटी, दुसऱ्या दिवशी २.२५ कोटी, तिसऱ्या दिवशी २.५० कोटी रुपयांची कमाई चित्रपटाने केली. गेल्या चार दिवसात चित्रपटाने ८.२५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करत नसल्याचे दिसत आहे.
वाचा: टायगर श्रॉफ आणि अक्षय कुमारची मजेशीर होळी, व्हिडीओ पाहून येईल हसू
‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर अभिनेता रणदीप हुड्डाने सावरकरांची भूमिका साकारली आहे. तर अभिनेत्री अंकिता लोखंडे सावकरांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसत आहे. सावरकरांचा जीवनप्रवास या चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मराठी भाषेतील चित्रपटाला अभिनेता सुबोध भावेने आवाज दिला आहे. मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषेत प्रदर्शित झालेल्या चित्रपटाला प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही.