मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  दर्जा! पहिल्या तीन दिवसांमध्ये 'हंबीरराव'ची विक्रमी कमाई, जमवले 'इतके' कोटी

दर्जा! पहिल्या तीन दिवसांमध्ये 'हंबीरराव'ची विक्रमी कमाई, जमवले 'इतके' कोटी

Payal Shekhar Naik HT Marathi
May 31, 2022 11:21 AM IST

'हंबीरराव' चित्रपटाने आपलं वेगळेपण राखत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत असं म्हणता येईल. त्याचं कारण म्हणजे चित्रपटाने पहिल्या तीन दिवसात केलेली कमाई.

'हंबीरराव'
'हंबीरराव'

सध्या मराठी प्रेक्षकांवर शिवकालीन चित्रपटांचा भडीमार होत आहे. शिवरायांच्या अफाट शौर्याच्या अनेक कथा त्यांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळतायत. तरीही 'हंबीरराव' चित्रपटाने आपलं वेगळेपण राखत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत असं म्हणता येईल. त्याचं कारण म्हणजे चित्रपटाने पहिल्या तीन दिवसात केलेली कमाई. लोकप्रिय अभिनेता प्रवीण तरडे दिग्दर्शित 'हंबीरराव' चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद लाभतो आहे. गश्मीर महाजनी, श्रुती मराठे, स्नेहल तरडे यांसारख्या दमदार कलाकारांच्या अभिनयाने सजलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं आहे.

'हंबीरराव' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या तीन दिवसांतच या चित्रपटाने कोटींचा गल्ला जमवलाय. प्रवीण याने इंस्टाग्रामवर एक पोस्ट करत यासंबंधी माहिती दिली आहे. पहिल्या तीन दिवसात या चित्रपटाने तब्बल ८ कोटी ७१ लाख रुपयांची कमाई केली आहे. ही पोस्ट करत प्रवीणने संपूर्ण प्रेक्षकवर्गाचे आभार मानले आहेत. एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या दिवशी या चित्रपटाने १ कोटींचा गल्ला जमवला होता. त्यानंतर शनिवारी आणि रविवारी यामध्ये प्रचंड वाढ झालेली पाहायला मिळाली. शनिवारी चित्रपटाने २ कोटी ५० लाखांच्या आसपास कमाई केली होती. तर रविवारी मिळालेल्या प्रतिसादानंतर चित्रपटाने तब्बल ४ कोटी २० लाखांची विक्रमी कमाई केली.

शिवरायांच्या आणि संभाजी राजेंच्या सोबत मिळून स्वज्यासाठी लढणाऱ्या सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पराक्रमावर आधारलेल्या या चित्रपटासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. प्रवीणच्या या पोस्टवर चाहत्यांनी देखील लाईक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. 'ही संपूर्ण मेहनत तुमची आहे, यासाठी तुमचं अभिनंदन', 'स्वराज्याच्या दोन्हीं राजांचा कमी वेळात एवढा छान आणि दिव्य इतिहास दाखवल्याबद्दल धन्यवाद, अजून असेच चित्रपट निर्माण करा' ,'ही तर सुरुवात आहे जर असेच चालू ठेवाल तर आम्ही प्रेक्षक तुमच्या चित्रपटाला ह्याहून जास्त प्रतिसाद देत राहू, वायफळ खर्च करण्यापेक्षा अशा चित्रपटांवर खर्च केलेले नेहमीच चांगले', असं मत अनेक प्रेक्षकांनी व्यक्त केलं आहे.

IPL_Entry_Point