मराठमोळा अभिनेता प्रथमेश परबचा प्रत्येक चित्रपट हा प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरताना दिसतो. आता त्याच्या 'होय महाराजा' या मराठी चित्रपटाची घोषणा झाल्यापासून वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. लक्षवेधी शीर्षक असलेल्या या चित्रपटात नेमकं काय पाहायला मिळणार याची सिनेप्रेमींना प्रचंड उत्सुकता आहे. दिवसागणिक कुतूहल वाढवणाऱ्या 'होय महाराजा'चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून प्रथमेश परबचा अभिनय सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. प्रथमेश सोबतच वैभव मांगले, समीर चौघुले सर्वांची मने जिंकली आहेत. ट्रेलर पाहाता चाहत्यांमध्ये चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे.
वाचा: ठरलं! पहिला मराठी AI चित्रपट 'धर्मा- दि एआय स्टोरी' या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टिझर रिलीज करण्यात आला होता. त्यानंतर नुकत्याच रिलीज करण्यात आलेल्या ट्रेलरमध्ये क्राईम-कॅामेडी असलेल्या 'होय महाराजा'ची खरी झलक पाहायला मिळते. या कथेतील प्रथमेश परबने साकारलेले रमेशचे मुख्य कॅरेक्टर लक्ष वेधून घेताना दिसत आहे. सुटा-बुटात इंटरव्ह्यूला निघालेल्या प्रथमेशची बोलबच्चनगिरी ट्रेलरमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. मामाला मात्र आपल्या भाच्यावर खूप विश्वास असतो. आपला भाचा एक दिवस खूप मोठ्या उंचीवर जाईल असे त्यांना वाटत असते. मामाची व्यक्तिरेखा अभिनेता अभिजीत चव्हाणने साकारली आहे. स्वप्नांच्या दुनियेत रमलेल्या रमेशला अचानक आयशा (अंकिता लांडे) भेटते आणि ही 'अनयुजवल लाफ स्टोरी' पुढे सरकते. संदीप पाठकने साकारलेला भाई, समीर चौघुलेचा बॉसचा दरारा आणि वैभव मांगलेच्या रूपातील अण्णाही 'होय महाराजा' म्हणत हास्याची कारंजी फुलवून धमाल करणार आहेत.
वाचा: अभिनेत्री स्पृहा जोशीच्या आयुष्यात आहेत दोन सुपरहिरो, जाणून घ्या ते कोण?
'होय महाराजा' या चित्रपटातील एका नव्या कोऱ्या जोडीची केमिस्ट्री प्रेक्षकांना नक्कीच आवडणार आहे. या दोघांच्या जोडीला अभिजीत चव्हाण, संदीप पाठक, वैभव मांगले, समीर चौघुले आदी एका पेक्षा एक दिग्गज कलाकारांची फौज प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. हा चित्रपट ३१ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात हिंदी सिनेसृष्टीतील नामवंत फाईट मास्टर मोझेस फर्नांडिस यांनी अॅक्शन दिग्दर्शन केलं असून, संतोष फुटाणे यांनी कला दिग्दर्शन केलं आहे.
वाचा: आपण फक्त श्रद्धांजलीच्या पोस्ट लिहायच्या; पुण्यातील कार अपघातावर मराठी दिग्दर्शकाचा संताप