‘अरे हाय काय अन् नाय काय'... असे म्हणत रंगभूमीवर धुमाकूळ घालणारा माधव तुम्हाला आठवतोय का? हा माधव गेल्या काही काळात प्रेक्षकांना दिसेनासा झाला होता. मात्र, रसिक प्रेक्षक माधवची मनापासून वाट पाहात होते. आता अखेर हा माधव तुमच्या भेटीला येणार आहे. हो तुम्ही बरोबर ऐकले. 'गेला माधव कुणीकडे' हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर पाहायला मिळणार आहे. चाहत्यांसाठी हा सुखद धक्काच आहे. चला जाणून घेऊया कधी आणि कुठे पाहायला मिळणार हे नाटक.
'अरे हाय काय अन् नाय काय' असे म्हणत रंगभूमीवर पुन्हा एकदा हास्याचे फवारे उडवायला प्रशांत दामले आणि विनय येडेकर ही जोडगोळी सज्ज झाली आहे. या जोडीच्या 'गेला माधव कुणीकडे' या खुमासदार नाटकाने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. या नाटकाने अनेक वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन केले. प्रशांत दामले आणि विनय येडेकर यांच्या अफलातून टायमिंगवर पब्लिक फुल टू फिदा झाले होते. या नाटकातील प्रशांत दामले यांचा 'अरे हाय काय अन् नाय काय' हा डायलॉग आजही प्रेक्षकांच्या तोंडून बऱ्याचदा ऐकायला मिळतो.
वाचा: आनंद इंगळे आणि श्वेता पेंडसे रंगभूमीवर पहिल्यांदा एकत्र, 'या' नाटकात साकारणार भूमिका
'गेला माधव कुणीकडे' हे नाटक ७ डिसेंबर १९९२ रोजी रंगभूमीवर दाखल झाले होते. या नाटकाचे आजवर १८०२ प्रयोग झाले. मध्यंतरी काही वर्षे या नाटकाने ब्रेक घेतला खरा पण रसिकांच्या प्रेमळ आग्रहाखातर पुन्हा हे धमाल नाटक रसिकांच्या सेवेत रुजू होत आहे. काही नाटकांना रसिकांचे अफाट प्रेम लाभते. ‘गेला माधव कुणीकडे’ हे नाटक त्यापैकीच एक आहे. दोन महिलांशी लग्न केल्यामुळे उभा राहिलेला पेच आणि त्यातून निर्माण होणारे अनेक विनोदी प्रसंग, ते लपवण्यासाठी परस्परांना फसविण्याचा खेळ कुठल्या टोकाला जातो याची धमाल या नाटकात पाहायला मिळणार आहे.
वाचा: कोण आहे संजय लीला भन्साली यांची बहिण बेला सेहगल आणि शर्मिनची आई? वाचा
गौरी थिएटर्स निर्मित आणि प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन प्रकाशित 'गेला माधव कुणीकडे' नाटकाचा शुभारंभ येत्या १५ जून २०२४ रोजी वाशी येथील विष्णुदास भावे सभागृहात होणार आहे. दुपारी ४.००वाजता या नाटकाचा प्रयोग होणार आहे. तिकीट विक्रीचा शुभारंभ १ जून रोजी फक्त ‘तिकीटलाय’ या अॅपवर सुरु होणार आहे.
वाचा: बॉलिवूड कलाकारांवरही भारी पडली मराठमोळी छाय कदम, 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये झाले 'या' सिनेमाचे स्क्रिनिंग
'गेला माधव कुणीकडे' या नाटकात प्रशांत दामले आणि विनय येडेकर या जोडीसोबाबत नीता पेंडसे, तन्वी पालव, राजसिंह देशमुख, अक्षता नाईक आदि कलाकारांच्या भूमिका आहेत. प्रकाशयोजना किशोर इंगळे यांची आहे. ध्वनी संयोजन प्रकाश खोत तर नेपथ्य प्रमुख मधुकर बाड आहेत.