आजकाल सगळीकडे बायोपिकची हवा पाहायला मिळते. वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गजांच्या आयु्ष्यावर चित्रपट प्रदर्शित होताना दिसतात. यामध्ये मराठी चित्रपटसृष्टीदेखील मागे नाही. शाहिरी परंपरेतले अजरामर नाव असलेल्या लोकशाहीर पठ्ठे बापूराव यांच्या जीवनावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर नुकताच प्रदर्शित झाले असून सोशल मीडियावर चर्चेत आहे.
अभिनेता, दिग्दर्शक प्रसाद ओक यांनी "कच्चा लिंबू", "हिरकणी", "चंद्रमुखी" अशा चित्रपटांतून आपलं दिग्दर्शकीय कौशल्य दाखवून दिलं आहे. आता ते शाहिरी परंपरेतलं अजरामर नाव असलेल्या लोकशाहीर पठ्ठे बापूराव यांचं जीवनचरित्र 'पठ्ठे बापूराव' या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर घेऊन येत असून, या चित्रपटात त्यांच्यासह अमृता खानविलकर “पवळा” च्या भूमिकेत दिसणार आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.
वाचा: अक्षय कुमारचा ‘मिशन रानीगंज’ आता ऑस्करमध्ये दाखवणार जलवा; निर्मात्यांची मोठी घोषणा!
श्रीधर श्रीकृष्ण कुलकर्णी रेठरेकर, महाराष्ट्राच्या शाहिरी परंपरेत "पठ्ठे बापूराव" या नावाने प्रसिद्ध झाले. पठ्ठे बापूरावांनी गण, गौळण, भेदिक, झगड्याच्या, रंगबाजीच्या, वगाच्या अशा विपुल लावण्या रचल्या. त्यांच्या लावण्या आणि कवनं तमाशा फडातून गायल्या जात होत्या. मात्र त्यांना त्यांच्या जीवनात मोठा संघर्ष करावा लागला. पठ्ठे बापूरावांचा हाच जीवनसंघर्ष नव्या पिढीपर्यंत आणण्याचा प्रयत्न प्रसाद ओक करत आहेत. या चित्रपटात आणखी कोणते कलाकार दिसणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. डेस्टिनी प्रॉडक्शन्सच्या प्रकाश देवळे,सपना लालचंदानी हे "पठ्ठे बापूराव" या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. चित्रपटाचे लेखन आबा गायकवाड यांनी केले असून छायांकन संजय मेमाणे यांचे असणार आहे.
संबंधित बातम्या