गेल्या काही दिवसांपासून ‘धर्मवीर’ आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाची गोष्ट सांगणार ‘धर्मवीर २’ हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओक महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘धर्मवीर’ या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर निर्मात्यांनी ‘धर्मवीर २’ची घोषणा केली. त्यानंतर चित्रपटाचे प्रदर्शित झालेले टीझर आणि पोस्टर प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारे आहेत. आता या चित्रपटातील नवे गाणे प्रदर्शितझाले असून सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.
हिंदुत्व आणि मराठी अस्मिता पुढे घेऊन जाणाऱ्या धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आज पुण्यतिथीचे औचित्य साधून "धर्मवीर २" या आगामी चित्रपटातील "असा हा धर्मवीर...." हे गाणे सोशल मीडियावर लाँच करण्यात आले आहे. दिघे साहेबांची वेगवेगळी रुपे दाखवणारे, प्रेक्षकांच्या मनात एक वेगळीच ऊर्जा निर्माण करणारे असे हे गाणे आहे. विश्वजीत जोशी यांनी लिहिलेल्या या गीताला मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अविनाश - विश्वजीत या जोडगोळीने या गीताला संगीत दिले असून सुप्रसिद्ध बॉलिवुड गायक सुखविंदर सिंग यांच्या दमदार आवाजात हे गाण रेकॉर्ड करण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वीच ‘धर्मवीर २’ या चित्रपटाचे पोस्टर लाँच करण्यात आले होते. ‘धर्मवीर २’च्या पोस्टरवर ‘साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट’ असा उल्लेख करण्यात आला आहे. धर्मवीर चित्रपटात दिघे साहेबांचे जीवनचरित्र दाखवल्यानंतर आता ‘धर्मवीर २’मध्ये हिंदुत्त्वाची गोष्ट कशी दाखवली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्वसामान्यांसाठी झटणारे, अन्याय रोखणारे, महिलांना न्याय मिळवून देणारे, धर्मासाठी लढणारे दिघेसाहेब या गाण्यात दिसतात. या गाण्यातून साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट उलगडते. त्यामुळे आता चित्रपटात साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट कशी दाखवली आहे याचे सर्वसामान्य लोकांमध्ये कुतुहल निर्माण झाले आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
वाचा: अरबाज खानचा मुलगा अरहान सावत्र आईसोबत फिरतानाचा व्हिडीओ व्हायरल, दोघांमधील नाते पाहून नेटकरी खूश
"धर्मवीर -२" या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओज आणि साहील मोशन आर्ट्स यांनी केली आहे. तर लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे यांनी निभावली आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळाला आहे. "धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे" या चित्रपटाची गाणी प्रचंड गाजली होती. त्यामुळे "धर्मवीर - २" मधील गाण्यांविषयीही कमालीची उत्सुकता आहे.