गेल्या काही दिवसांपासून ‘धर्मवीर’ आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाची गोष्ट सांगणार ‘धर्मवीर २’ हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओक महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘धर्मवीर’ या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर निर्मात्यांनी ‘धर्मवीर २’ची घोषणा केली. त्यानंतर चित्रपटाचे प्रदर्शित झालेले टीझर आणि पोस्टर प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारे आहेत. काही दिवसांपूर्वी चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली होती. आता नवी तारीख समोर आली आहे.
बहुचर्चित "धर्मवीर - २" हा चित्रपट ९ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार होता. पण राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच ओढवलेल्या पूरपरिस्थितीमुळे चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले होते. सध्याची परिस्थिती ही नियंत्रणात असून अजून दीड महिन्याचा अवधी घेऊन येत्या २७ सप्टेंबरला "धर्मवीर २" हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय आता निर्मात्यांनी घेतला आहे. २७ सप्टेंबेर रोजी हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये चित्रपटाचे प्रदर्शन होणार आहे.
चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढली. प्रदर्शनाची तारीख पुढे गेल्यावर चित्रपटगृहांकडून विचारणा होत होती ,अनेक ग्रुप बुकिंगसाठी थांबलेले होते ,परदेशातून प्रदर्शनासाठी विचारणा होत होती, सोशल मीडियावरही चित्रपट कधी प्रदर्शित होणार ? याची विचारणा अनेकजण करत होते. आता प्रेक्षकांना चित्रपटासाठी केवळ २७ सप्टेंबर पर्यंत अजून थोडी वाट पहावी लागणार आहे.
‘धर्मवीर २’ या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओज आणि साहील मोशन आर्ट्स या निर्मिती संस्थेचे मंगेश देसाई, उमेश कुमार बन्सल यांनी केली आहे. कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे यांनीच निभावली असून कॅमेरामन म्हणून महेश लिमये यांनी काम पाहिले आहे. चित्रपटात अभिनेता प्रसाद ओक हा आनंद दिघे यांची भूमिका साकारताना दिसत आहे.
वाचा : 'आगाऊ नको, डांबरट नको…', छोट्या पुढारीने घेतली निक्की तांबोळीची फिरकी
काही दिवसांपूर्वीच ‘धर्मवीर २’ या चित्रपटाचे पोस्टर लाँच करण्यात आले होते. ‘धर्मवीर २’च्या पोस्टरवर ‘साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट’ असा उल्लेख करण्यात आला आहे. धर्मवीर चित्रपटात दिघे साहेबांचे जीवनचरित्र दाखवल्यानंतर आता ‘धर्मवीर २’मध्ये हिंदुत्त्वाची गोष्ट कशी दाखवली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आता सर्वजण २७ सप्टेंबरची वाट पाहात आहेत.