गेल्या काही दिवसांपासून ‘धर्मवीर’ आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाची गोष्ट सांगणार ‘धर्मवीर २’ हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओक महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘धर्मवीर’ या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर निर्मात्यांनी ‘धर्मवीर २’ची घोषणा केली. त्यानंतर चित्रपटाचे प्रदर्शित झालेले टीझर आणि पोस्टर प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारे आहेत. आता निर्मात्यांनी चित्रपटाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आता हा निर्णय काय आहे चला जाणून घेऊया...
बहुचर्चित "धर्मवीर - २" या चित्रपटाचं प्रदर्शन आता लांबणीवर पडले आहे. ९ ऑगस्टला "धर्मवीर - २" चित्रपट जगभरात मराठी आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र राज्यात होत असलेली अतिवृष्टी, त्यामुळे ओढवलेल्या पूरपरिस्थितीमुळे चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. नव्या तारखेविषयी अद्याप माहिती समोर आलेली नाही.
‘धर्मवीर २’ या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओज आणि साहील मोशन आर्ट्स या निर्मिती संस्थेचे मंगेश देसाई, उमेश कुमार बन्सल यांनी केली आहे. कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे यांनीच निभावली असून कॅमेरामन म्हणून महेश लिमये यांनी काम पाहिले आहे. चित्रपटात अभिनेता प्रसाद ओक हा आनंद दिघे यांची भूमिका साकारताना दिसत आहे.
काही दिवसांपूर्वीच ‘धर्मवीर २’ या चित्रपटाचे पोस्टर लाँच करण्यात आले होते. ‘धर्मवीर २’च्या पोस्टरवर ‘साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट’ असा उल्लेख करण्यात आला आहे. धर्मवीर चित्रपटात दिघे साहेबांचे जीवनचरित्र दाखवल्यानंतर आता ‘धर्मवीर २’मध्ये हिंदुत्त्वाची गोष्ट कशी दाखवली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
वाचा: 'माझं कुटुंब उद्ध्वस्त झालं', बिग बी आणि जया बच्चनच्या लग्नावर अशी होती वडिलांची प्रतिक्रिया
चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई म्हणाले, की गेल्या काही दिवसांपासून अवघ्या महाराष्ट्रात पूर जन्य परिस्थिती निर्माण झाली आहेत, काही गाव पाण्याखाली गेली असून काही गावांचा संपर्कही तुटला आहे. राज्यात सुरु असलेली ही पूरपरिस्थिती पाहता "धर्मवीर - २" हा चित्रपट ९ ऑगस्टला प्रदर्शित करणे योग्य वाटत नाही. महाराष्ट्रातील जनतेच्या डोळ्यांत पाणी असताना, त्यांच्यासमोर असलेल्या अडचणी असताना त्याच काळात चित्रपट प्रदर्शित करण्यापेक्षा परिस्थितीचा आढावा घेऊन आम्ही चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करू असे सांगितले.
संबंधित बातम्या