
मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत प्राजक्ता माळी हे नाव कायमच आघाडीवर असते. तिने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केलं आहे. सुरुवातीच्या काळात काही मालिकांत काम करून प्राजक्ता घराघरांत पोहोचली. फक्त मालिकाच नव्हे तर मराठी चित्रपटांमध्ये काम करण्याचंही स्वप्न तिनी पाहिलं आणि ते स्वप्न सत्यात उतरवलं. मालिका, चित्रपट, वेबसिरीज या तिन्ही माध्यमांमध्ये प्राजक्ता उत्तम काम करतेच, पण त्याबरोबरीनेच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारीही तिनी उत्तमरीत्या पेलली आहे. सुरुवातीपासूनच ती ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचा महत्त्वाचा भाग आहे. प्राजक्ताने अधिक मेहनत करत कलाविश्वात स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आता प्राजक्ता पुन्हा एकदा मालिकेत दिसणार आहे. हा चाहत्यांसाठी सुखद धक्काच आहे.
प्राजक्ता माळी सोनी मराठी वाहिनीवरील ‘पोस्ट ऑफीस उघडं आहे’ या मालिकेत दिसणार आहे. तब्बल ६ वर्षांनी ती मालिकेत पुनरागमन करते आहे. तिला मालिकेत पाहण्याची संधी मिळत असल्याने तिचा चाहतावर्ग नक्कीच खूश होणार आहे आणि तिच्या चाहत्यांसाठी ही पर्वणी ठरणार आहे. पारगाव पोस्टात तिच्या येण्यामुळे काय धमाल होणार आहे, हे पाहणे रंगतदार ठरेल.
'पोस्ट ऑफीस उघडं आहे' या मालिकेत आपण पाहिले की पोस्टात संगणक येण्याने आधीच सर्वांच्या कामात गोंधळ निर्माण झाले आहेत. त्यात आता पोस्टात नवीन एण्ट्री झाल्यामुळे आणखीन काय पाहायला मिळणार, हे पाहणे प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचं ठरणार आहे. तसेच प्राजक्ताला मालिकेत पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
संबंधित बातम्या
