मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळी ओळखली जाते. तिने अभिनय आणि सौंदर्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आज ८ ऑगस्ट रोजी प्राजक्ताचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने प्राजक्ताने चाहत्यांना भेट दिली आहे. तिने तिचा आगामी बहुचर्चित चित्रपट 'फुलवंती'च्या प्रदर्शनाची तारीख जाहिर केली आहे. या चित्रपटाची निर्मिती देखील प्राजक्ता माळीने केली आहे.
मागील काही महिन्यांपासून चर्चेचा विषय ठरलेल्या 'फुलवंती' या भव्य कलाकृतीच्या प्रदर्शनाची तारीख अखेर जाहीर झाली असून; निर्माती प्राजक्ता माळी हिने आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक लक्षवेधी मोशन पोस्टर शेअर करत या चित्रपटाच्या प्रदर्शनाची घोषणा केली आहे. येत्या ११ ऑक्टोबर रोजी 'फुलवंती' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मोशन पोस्टरमध्ये एका सजलेल्या राजेशाही पालखीत भरजरी वस्त्रे आणि आभूषणे परिधान केलेली 'फुलवंती' दिमाखत बसलेली दिसत आहे. या सौंदर्यवतीच्या मोहमयी रूपाने कोणीही घायाळ होईल. पोस्टरला देण्यात आलेल्या संगीतावरून हा संगीतमय चित्रपट असल्याचा अंदाज प्रेक्षक वर्तवत आहेत. मुळात पहिली झलक पाहूनच 'फुलवंती'ची भव्यता कळतेय. रसिकप्रेक्षकांसाठी सांगीतिक नजराणा असलेला हा चित्रपट मराठी सिनेसृष्टीतील आजवरची सर्वात भव्यदिव्य, अविस्मरणीय अशी कलाकृती ठरेल.
“पद्मविभूषण स्वर्गवासी बाबासाहेब पुरंदरे” यांच्या 'फुलवंती' या कादंबरीवर हा सिनेमा आधारीत आहे. त्या ११ ऑक्टोबर रोजी 'फुलवंती' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्नेहल प्रविण तरडे दिग्दर्शित या चित्रपटात प्राजक्ता माळी 'फुलवंती'च्या भूमिकेत झळकणार आहे. स्नेहल तरडे एक अभिनेत्री म्हणून सगळ्यांच्या परिचयाच्या असून 'फुलवंती'च्या निमित्ताने त्या दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहेत.
वाचा: जॉन अब्राहमनं घेतली ऑलिम्पिक पदक विजेत्या मनू भाकर हिची भेट! फोटो पाहून नेटकरी संतापले, काय आहे कारण?
''या क्षणाची मी आतुरतेने वाट पाहत होते. वाढदिवसाच्या निमित्ताने मी माझ्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी देऊ शकले याबद्दल देवाचे अनेकानेक आभार. 'फुलवंती' माझ्यासाठी खूप खास आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने मी निर्मिती क्षेत्रात प्रवेश केला आणि मला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. अनेकांनी मला विचारले की 'फुलवंती'च का? फुलवंतीच्या कथानकाच्या मी प्रेमात पडले. साहित्य क्षेत्रातील काही दु्र्मिळ हिऱ्यांपैकी 'फुलवंती' एक आहे. त्यामुळे बाबासाहेबांच्या 'फुलवंती' या कांदंबरीवर चित्रपट व्हावा, अशी माझी मनापासून इच्छा होती. मागील तीन वर्षांपासून अत्यंत अभ्यास करून, मेहनत घेऊन आम्ही ही भव्य 'फुलवंती' तुमच्यापर्यंत घेऊन येत आहोत. 'फुलवंती'मध्ये साथ लाभलेल्या पॅनोरमा स्टुडिओजच्या कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, मुरलीधर छतवानी, रविंद्र औटी, मंगेश पवार, अमोल जोशी, विक्रम धाकतोडे, श्वेता माळी आणि दिग्दर्शिका स्नेहल तरडे या सगळ्यांचेच मी आभार मानते. 'फुलवंती' आता प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाली आहे. मला खात्री आहे, ही मराठी चित्रपटसृष्टीतील आजवरची सर्वात भव्य कलाकृती ठरेल'' असे प्राजक्ता म्हणाली.