Prajakta Mali : गेल्या दीड महिन्यापासून हे सुरू आहे, आमची अब्रु वेशीवर का टांगता?; प्राजक्ता माळीला अश्रू अनावर
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Prajakta Mali : गेल्या दीड महिन्यापासून हे सुरू आहे, आमची अब्रु वेशीवर का टांगता?; प्राजक्ता माळीला अश्रू अनावर

Prajakta Mali : गेल्या दीड महिन्यापासून हे सुरू आहे, आमची अब्रु वेशीवर का टांगता?; प्राजक्ता माळीला अश्रू अनावर

Dec 28, 2024 07:43 PM IST

Prajakta Mali on Suresh Dhas : प्राजक्ता म्हणाली की, माझा सुरेश धस यांना बेसिक प्रश्न आहे. तुम्ही राजकारणी आहात,आम्ही कलाकार आहोत. तुम्ही तुमचं राजकारण करा,पण आम्हाला कलाकारांना का मध्ये घेता. परळीला केवळ महिला कलाकारच येतात का,पुरुष कलाकार येत नाहीत का?

प्राजक्ता माळी पत्रकार परिषदेत बोलताना.
प्राजक्ता माळी पत्रकार परिषदेत बोलताना.

बीडच्या प्रकरणावरून धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना भाजप आमदार सुरेश धस यांनी  रश्मिका मंधाना, सपना चौधरी आणि मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्यावर भाष्य केलं.  प्राजक्ताताई माळी सुद्धा आमच्या परळीत येतात. प्राजक्ता ताईंचा अतिश्य जवळचा पत्ता सापडायचा असेल तर आमचा परळी पॅटर्न आहे. असं वक्तव्य सुरेश धस यांनी केलं होतं. आमदार  सुरेश धस यांच्या या वक्तव्यानंतर आता प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली असून धस यांनी सर्व महिलांचा अपमान केल्यानं आपली माफी मागावी, अशी मागणी केली.

प्राजक्ता माळी हिनं आज (शनिवार) संध्याकाळी पाच वाजता मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद घेतली यावेळी तिचा कंठ दाटून आल्याचं पाहायला मिळालं. प्राजक्ता म्हणाली, गेल्या दीड महिन्यापासून हे सुरू आहे. पण हतबलता म्हणून मी शांत बसले. लोकप्रतिनिधी आपल्यावर चिखलफेक करतात, तेव्हा बोलणं गरजेचं  आहे. राजकारणात महिला कलाकरांना का खेचता असा सवालही प्राजक्तानं धस यांना केला आहे. 

माळी पुढे म्हणाली की, भाजप आमदार सुरेश धस यांच्याविरोधात महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. मुख्य़मंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची लवकरच भेट घेऊन धस यांच्यावर ठोस कारवाई करण्याची मागणी करणार आहे. माझी आई गेली कित्येक दिवस झोपलेली नाही. माझ्या भावाने सगळे सोशल मीडिया अकाऊंट्स डिलीट केले आहेत. माझ्या कुटुंबावरही याचा अत्यंत वाईट परिणाम होतोय. या सगळ्याला तोंड देणं हे अजिबात सोपं नाही.

संपूर्ण महिलांचा अपमान -

प्राजक्ता म्हणाली की, माझा सुरेश धस यांना बेसिक प्रश्न आहे. तुम्ही राजकारणी आहात, आम्ही कलाकार आहोत. तुम्ही तुमचं राजकारण करा, पण आम्हाला कलाकारांना का मध्ये घेता. परळीला केवळ महिला कलाकारच येतात का, पुरुष कलाकार येत नाहीत का? तुम्हा महिलांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत नाहीत तर, त्यांच्या कतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताय. यातून तुमची मानसिकता दिसते. माझी जाहीर माफी मागा, केवळ  माझीच नाही तर इतर अभिनेत्रींचंही त्यांनी नाव घेतलं, त्यांचीही माफी मागावी, अशी मागणी माळी हिने केली आहे.

करुणा मुंडे यांना आवाहन -

प्राजक्ता माळी हिने करुणा मुंडेंच्या आरोपांना उत्तर देत म्हटले की, मी करुणाताईंना सांगू इच्छिते की तुम्ही स्वत: एक महिला आहात. महिलांना होणारा त्रास तुम्ही समजू शकता. या पुरुषप्रधान संस्कृतीत महिलाच महिलांच्या बाजूने उभ्या राहिल्या नाहीत आणि चिखलफेक करत राहिल्या तर कसं होणार? मी सांगू इच्छिते की तुम्हाला माझ्याबद्दल मिळालेली माहिती अत्यंत चुकीची आहे. तुमच्या माहितीचा स्त्रोत चुकीचा आहे.  यापुढे कुठल्याही गोष्टीची शहानिशा केल्याशिवाय तुम्ही असं वक्तव्य करणार नाही, असा विश्वास व्यक्त करते. महिल्यांच्या बाबतीत तुम्ही संवेदनशीलपणे बोलाल, ही अपेक्षा.

Whats_app_banner