आपल्या दमदार अभिनयाने मनोरंजन विश्व गाजवणाऱ्या अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने आता अनेक क्षेत्रांमध्ये आपली जागा निर्माण केली आहे. नाटक, मालिका, चित्रपट आणि वेब सीरिजमधून आपल्या अभिनयाचा जलवा दाखवणाऱ्या प्राजक्ता माळीने काही महिन्यांपूर्वी आपला कविता संग्रह प्रकाशित केला होता. तर, त्यानंतर तिने 'प्राजक्तराज' नावाचा पारंपरिक दागिन्यांचा ब्रँड सुरू करत व्यवसाय क्षेत्रात देखील पदार्पण केले होते. आता प्राजक्ताने चाहत्यांना आणखी एक सुखद धक्का देण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच प्राजक्ता माळी राजकारणात प्रवेश करणार अशी कुजबुज सुरू झाली आहे. प्राजक्ताचे चाहते देखील यावर चर्चा करत आहे. अशातच प्राजक्ताने विजयादशमीनिमित्त एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवरुन चर्चांना उधाण आले आहे.
प्राजक्ताने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर . नागपूरमध्ये विजयादशमीनिमित्त ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’च्या ‘विजयादशमी उत्सव’ कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमाला सरसंघचालक मोहन भागवत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. प्राजक्ताने हा व्हिडीओ शेअर करत “आज आयुष्यात पहिल्यांदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा – विजयादशमी उत्सव अनुभवता आला. तेही केंद्रीय मंत्री – नितीनजी गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासमवेत. समस्त संघ परिवाराचे यासाठी मनापासून आभार” असे म्हटले आहे.
वाचा: 'बाहुबली' प्रभासला कधी अभिनेता बनायचं नव्हतं! 'या' क्षेत्राची होती आवड...
सध्या सोशल मीडियावर प्राजक्ताचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. अनेकांनी यावर कमेंट केल्या आहेत. एका यूजरने “हा संकेत आहे की लवकरच तुझी भाजपमधे एन्ट्री होणार” असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने “हार्दिक अभिनंदन! आता तुम्ही खूप लोकांच्या नावडत्या होणार; पण काही हरकत नाही. आगे बढो; चलो” अशी कमेंट केली आहे. आता प्राजक्ता खरच राजकारणात प्रवेश करणार का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.