मराठी चित्रपटसृष्टीमध्ये एकापाठोपाठ एक असे अनेक चांगले चित्रपट प्रदर्शित होताना दिसत आहेत. पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या लेखणीतून साकारलेली 'फुलवंती' ही अलौकिक कलाकृती देखील या यादीतील एक आहे. चित्रपटाचे अप्रतिम सेट्स, उच्च तांत्रिकमूल्ये, दमदार ऐतिहासिक व्यक्तिरेखा त्याला तेवढ्याच धारदार संवादाची सोबत अशा या ‘फुलवंती’ चित्रपटाची चांगलीच चर्चा सुरु आहे. आता या चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित झाला आहे.
पेशवाई काळातील ‘फुलवंती’ नावाची सुप्रसिद्ध नर्तिका आणि प्रकांडपंडीत व्यंकटशास्त्री यांची दमदार कथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. देखण्या कलाविष्काराने सजलेली फुलवंती मराठी सिनेसृष्टीतील भव्यदिव्य, अविस्मरणीय कलाकृती ठरणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आणखी शिगेला पोहोचली आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाचा टीझर सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.
फुलवंती चित्रपटातील अभिनेत्री प्राजक्ता माळी ही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकताच प्रदर्शित झालेल्या टीझरमधील प्राजक्ताचा लूक हा पाहण्यासारखा आहे. तिचे आरसपाणी सौंदर्य सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. तसेच गश्मीर महाजनीचा प्रकांडपंडीत यांचा लूक पाहण्यासारखा आहे. सोशल मीडियावर प्राजक्ता माळी आणि गश्मीरचा हा लूक पाहून सर्वजण चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत.
वाचा: मद्यधुंद अवस्थेत रस्त्यावर झोपले अन्...; जाणून घ्या महेश भट्ट यांच्यासोबत नेमकं काय झालं होतं
‘फुलवंती’ चित्रपटाचे संवाद लेखन प्रविण विठ्ठल तरडे यांचे असून दिग्दर्शन स्नेहल प्रविण तरडे करीत आहेत. चित्रपटाच्या छायाचित्रणाची जबाबदारी महेश लिमये यांनी सांभाळली आहे. कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, मंगेश पवार, श्वेता माळी,प्राजक्ता माळी चित्रपटाचे निर्माते आहेत. तसेच या चित्रपटात प्राजक्ता माळी आणि गश्मीर महाजनी सोडून इतर कोणते कलाकार दिसणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा चित्रपट ११ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.