मराठी चित्रपटसृष्टीमध्ये एकापाठोपाठ एक असे अनेक चांगले चित्रपट प्रदर्शित होताना दिसत आहेत. पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या लेखणीतून साकारलेली 'फुलवंती' ही अलौकिक कलाकृती देखील या यादीतील एक आहे. पहिल्यादिवसापासून चर्चेत असणाऱ्या या चित्रपटातील एक गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्यातील अभिनेत्री प्राजक्ता माळीते घायाळ करणारे सौंदर्य सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. तुम्ही हे गाणे पाहिले नसेल तर नक्की पाहा...
बहारदार नृत्य, मनाला भुरळ घालणारी अदाकारी आणि चैतन्य निर्माण करणाऱ्या घुंगरांच्या आवाजाने मनोरंजन करायला मदनमंजिरी सज्ज झाली आहे. सध्या सगळीकडे फुलवंतीची चर्चा सुरु आहे. या चित्रपटातील मदनमंजिरी हे नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. गाणे प्रदर्शित होताच काही वेळातच सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे. अनेकांनी कमेंट करत प्राजक्ता माळीच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे.
'मदनमंजिरी' या गाण्यात प्राजक्ता माळीने लाल रंगाची आणि हिरवे काठ असलेली नऊवारी साडी नेसली आहे. त्यावर केसात गजरा, कपळी टीकली, गळ्यात सुंदर दागिने, पायात घुंगरु घातले आहे. या लूकमध्ये प्राजक्ता अतीशय ठसकेबाज दिसत आहेत गाण्यातला जोश प्रत्येकाला मंत्रमुग्ध करणारा आहे. या गाण्याचे बोल खूप सुंदर आहेत. संगीतही तितक्याच ताकदीचे आहे. त्यामुळे हे गाणे गाताना खूप मजा आल्याचं वैशाली सांगते. प्रेक्षकांना हे गाणं नक्कीच ठेका धरायला लावेल. प्राजक्ताच्या नृत्याने या गाण्याला अजून रंग चढला आहे.
'अशी मी मदनमंजिरी सुबक ठेंगणी लखलखते सुंदरी... अशी मी मदनमंजिरी चटक चांदणी चमचमते अंबरी.. ' अशी अतिशय ठसकेबाज शब्दरचना गीतकार डॉ. प्रसाद बिवरे यांची असून वैशाली माडे यांच्या आवाजाने या गाण्याला चारचाँद लागले आहेत. संगीत अविनाश-विश्वजीत यांचे तर नृत्यदिग्दर्शन उमेश जाधव यांचे आहे.
वाचा: अख्खा हिंदुस्तान गाजवला, आता पुण्याला नादवणार; 'फुलवंती' सिनेमाचा लक्षवेधी टीझर प्रदर्शित
‘फुलवंती’ चित्रपटाचे संवाद लेखन प्रविण विठ्ठल तरडे यांचे असून दिग्दर्शन स्नेहल प्रविण तरडे करीत आहेत. चित्रपटाच्या छायाचित्रणाची जबाबदारी महेश लिमये यांनी सांभाळली आहे. कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, मंगेश पवार, श्वेता माळी,प्राजक्ता माळी चित्रपटाचे निर्माते आहेत. तसेच या चित्रपटात प्राजक्ता माळी आणि गश्मीर महाजनी सोडून इतर कोणते कलाकार दिसणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा चित्रपट ११ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.