Prabhas Salaar Movie: मनोरंजन विश्वाचा 'डार्लिंग' अभिनेता प्रभास 'सालार' या चित्रपटातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातून प्रभासचा धमाकेदार अंदाज पाहायला मिळणार आहे. चाहते देखील त्याच्या या चित्रपटासाठी उत्सुक आहेत. 'सालार' हा चित्रपट २२ डिसेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून, आता यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. आता या चित्रपटाच्या आगाऊ बुकिंगसाठी चाहते आणि प्रेक्षक रांगा लावून उभे राहिले आहेत. या दरम्यान रसिक प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. प्रभासच्या चाहत्यांना 'सालार' हा चित्रपट २४ तास पाहण्याची संधी मिळणार आहे.
तेलंगणा सरकारने या चित्रपटाच्या प्रेक्षकांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. या चित्रपटाचे शो २४ तास थिएटरमध्ये सुरू राहणार आहेत. सरकारने देखील 'सालार'च्या वितरकांना या चित्रपटाच्या तिकिटांच्या किंमती वाढवण्याची परवानगी दिली आहे. तर, यासोबतच थिएटर मालकांना या चित्रपटाचे शो २४ तास लावण्याची परवानगी देण्यात आली आहे. सरकारने एक निवेदन जारी केले आहे, ज्यात त्यांनी म्हटलेय की, 'सगळ्या सुरक्षा व्यवस्थांचा आढावा घेऊन सालार चित्रपटाचा शो सकाळी ४ वाजल्यापासून ते रात्री १ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.'
याच परिपत्रिकात असेही लिहिण्यात आले आहे की, २२ डिसेंबरपासून ते २८ डिसेंबरपर्यंत या चित्रपटाच्या तिकिटाच्या किंमती सिंगल स्क्रीनसाठी ६५ रुपये, तर मल्टीप्लेक्ससाठी १०० रुपयांनी वाढवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. रात्री १ वाजता देखील या चित्रपटाचा शो आयोजित करण्याची परवानगी मिळाल्याने आता थिएटर देखील २४ तास सुरू राहणार आहे.
'सालार' या चित्रपटाला आता याचा किती फायदा मिळतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. 'सालार' या चित्रपटातून पहिल्यांदाच प्रभास आणि सुकुमारनची जोडी मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. प्रभासचा हा चित्रपट पॅन इंडिया असून, अनेक भारतीय भाषांमध्ये रिलीज होणार आहे.
संबंधित बातम्या