Pori Tujha Mukhda Marathi Song : सध्या सर्वत्र रोमँटिक गाण्यांची जोरदार धूम आहे. अशी अनेक गाणी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. यातच आता या गाण्यांमध्ये एक नव्या हिट गाण्याचा यादीत समावेश झाला आहे. या गाण्याचं नाव आणि बोल 'पोरी तुझा मुखडा' असे आहे. या गाण्यात सर्वांचा लाडका कलाकार निक शिंदे मुख्य भूमिकेत दिसला आहे. या गाण्याने आता त्याच्या रोमँटिक गाण्यांमधील यशाची परंपरा कायम ठेवली आहे.
निक शिंदे आणि रोमँटिक गाणी याचं एक चांगलं समीकरण तयार झालं आहे. 'पोरी तुझा मुखडा' हे गाणं त्याच्या सुपरहिट गाण्यांपैकी एक असून, नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्यात प्रियकराची आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी असलेली हुरहूर आणि त्या भेटीच्या तयारीत त्याच्या मनात येणारे अनेक प्रश्न रंजकपणे दाखवण्यात आले आहेत. 'ती कशी दिसते?', 'तिचा चेहरा कसा आहे?' यासारख्या प्रश्नांची उत्तरं शोधताना प्रियकराची होणारी घालमेल या गाण्यातून फारच प्रभावीपणे दाखवली आहे.
गाण्यात प्रियकराच्या मनातील भावनांचा कधी खोडकर, कधी गंभीर, तर कधी उत्साही असा विविध रंग दाखवला आहे. गाण्याचे स्वरूप रोमँटिक असून, त्यात प्रेमाच्या गोडवे आणि दोघांच्या नात्याच्या खोडकर नात्याचा प्रत्यय येतो. या गाण्यात अभिनेता निक शिंदे आणि अभिनेत्री अंकिता मेस्त्री यांनी या प्रेमकथेची सुंदर रेखाटणी केली आहे. त्यांचे केमिस्ट्री प्रेक्षकांना वेगळ्याच जगात घेऊन जाणारी आहे. पण, गाण्यात एक खास गोष्ट आहे. त्यात एक स्पेशल पाहुणा देखील आहे, जो या गाण्याच्या लुकला आणखी मजेदार बनव आहे. हा स्पेशल पाहुणा आहे रील स्टार रितेश कांबळे. रितेशचा विनोदी आणि हटके अभिनय गाण्याची शोभा वाढवतो आणि या गाण्याला एक वेगळाच अंदाज देतो. रितेशच्या अभिनयाने गाण्याला नवा ट्विस्ट मिळत आहे.
'बिग हिट मीडिया' ने यावर्षीच्या सुरुवातीला या गाण्याची निर्मिती केली आहे. गाण्याच्या निर्मितीची धुरा हृतिक अनिल मनी आणि अनुष्का अविनाश सोलवट यांनी सांभाळली आहे. गाण्याचं संगीत प्रशांत नाकती आणि संकेत गुरव यांनी दिलं आहे. गाण्याचे दिग्दर्शन स्वप्नील पाटील याने केलं असून, त्याने गाण्याच्या प्रत्येक ओळीला एक नवी आणि हटके स्टेप्स दिल्या आहेत. गाण्याच्या गायनाची जबाबदारी रोहित राऊत आणि सोनाली सोनावणे यांनी आपल्या सुमधुर आवाजात निभावली आहे. हे गाणं यूट्यूबवर 'बिग हिट मीडिया' चॅनेलवर प्रदर्शित करण्यात आले असून, प्रेक्षकांकडून याला भरपूर प्रतिसाद मिळत आहे. 'पोरी तुझा मुखडा' या निक शिंदेच्या रोमँटिक गाण्याने रसिकांच्या मनाला हात घातला आहे.
संबंधित बातम्या