मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Ameen Sayani : ‘बिनाका गीतामाला’ फेम निवेदक व देशातील पहिले रेडिओ स्टार अमीन सयानी यांचे निधन

Ameen Sayani : ‘बिनाका गीतामाला’ फेम निवेदक व देशातील पहिले रेडिओ स्टार अमीन सयानी यांचे निधन

Haaris Rahim Shaikh HT Marathi
Feb 21, 2024 12:04 PM IST

Ameen Sayani Death News : ‘बिनाका गीतामाला’ या लोकप्रिय रेडिओ कार्यक्रमाद्वारे पन्नास ते नव्वदच्या दशकात देश-विदेशातील श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे प्रसिद्ध रेडिओ उदघोषक अमीन सयानी यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले.

Popular radio presenter Amin Sayani
Popular radio presenter Amin Sayani

Ameen Sayani Passes Away : आपल्या जादुई आवाजाने रेडिओ श्रोत्यांच्या मनावर अनेक दशके अधिराज्य गाजवणारे प्रसिद्ध रेडिओ उदघोषक अमीन सयानी यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. अमीन सयानी यांना बुधवारी सकाळी सहा वाजता हद्यविकाराचा झटका आला होता. त्यांना तातडीने मुंबईतील गिरगाव भागातील एच.आर. रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान सयानी यांचे निधन झाल्याची माहिती अमीन सयानी यांचा मुलगा राजिल सयानी यांनी प्रसारमाध्यमांना दिले आहे.

अमीन सयानी हे भारताचे पहिले रेडिओ स्टार होते. रेडिओ सिलोन (श्रीलंका) वरून १९५०च्या दशकात दर आठवड्यात लोकप्रिय हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम ‘बिना का गीतमाला' गीतमाला’द्वारे त्यांना देश-विदेशात अफाट प्रसिद्धी मिळवली होती. या काळात रेडिओ सिग्नल अतिशय अस्पष्ट ऐकू येत असतानाही श्रोते अतिशय आवडीने हा कार्यक्रम ऐकत असत. रेडिओ सिलोनवरून हा कार्यक्रम १९८८ पर्यंत प्रसारित झाला. त्यानंतर १९८९ साली कार्यक्रमाचे नाव बदलण्यात आलं. अमिन सयानी यांनी १९८९ ते १९९४ पर्यंत ‘सिबाका गीतमाला’ हा लोकप्रिय हिंदी गीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या विविध भारती स्टेशनवरून प्रसारित केला. 

मधूर आवाज आणि कूल स्टाईलचा मिलाफ

 

‘बिना का गीतमाला’ या कार्यक्रमाची सुरूवात अमिन सयानी आपल्या अनोख्या अंदाजात करायचे. ‘बहनों और भाईयों…’ हा अगदी प्रेमळ अंदाजात त्यांचा उदगार मनांमनांत घर करून राहिला आहे. रेडिओवरील अमिन सयानी यांची अफाट लोकप्रियता पाहून त्या काळातले मोठ्या, लोकप्रिय सिने अभिनेता आणि अभिनेत्रींच्या त्यांनी रेडिओसाठी मुलाखती घेतलेल्या आहेत. सयानी यांनी रेडिओ उदघोषक व्यतिरिक्त जाहिरातींना आवाज देण्याचे कामही केलेले आहे. सयानी यांनी तब्बल ५४ हजार रेडिओ कार्यक्रम आणि १९ हजार स्पॉट्स किंवा जिंगल्ससाठी आवाज दिला आहे. 

अमिन सयानी यांचा जन्म २१ डिसेंबर १९३२ रोजी मुंबईत राहणाऱ्या एका स्वातंत्र्यसैनिक कुटुंबात झाला. त्यांचे वडील स्वातंत्रपूर्व काळात मुंबईतील एक प्रतिथयश डॉक्टर होते. तर त्यांची आई कुलसूम सयानी या स्वातंत्र्य चळवळीत महात्मा गांधीसोबत साक्षरता मिशनमध्ये काम करत होत्या. मुंबईहून प्रकाशित होणाऱ्या साहित्य क्षेत्राला वाहिलेल्या एका ऊर्दू मासिकाचे  कुलसूम सयानी या संपादन करत होत्या. अमिन सयानी यांचे आजोबा, आईचे वडील, रज्जब अली पटेल हे महात्मा गांधी आणि मौलाना अबुल कलाम आझाद यांच्यावर उपचार करणारे खासगी डॉक्टर होते. अमिन सयानी यांचे मोठे बंधु हमीद सयानी हे आधीपासून रेडिओ उदघोषक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून ५० च्या दशकात अमिन सयानी हे सुद्धा रेडिओ उदघोषणा क्षेत्रात आले. अमिन सयानी यांचे प्राथमिक शिक्षण ग्वाल्हेरच्या सिंदिया बोर्डिंग स्कूलमध्ये झाले. या शाळेत त्यांची भेट रमा मट्टू या काश्मिरी पंडित तरुणीशी झाली. नंतर या दोघांनी लग्न केलं होतं. रमा मट्टू या रेडिओ उदघोषक आणि गायिका आहेत.

 

IPL_Entry_Point