Aanchal Tiwari Accident Death: लोकप्रिय वेब सीरिज 'पंचायत २'मध्ये काम करणारी अभिनेत्री आंचल तिवारी हिचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. आंचल भोजुपरी इंडस्ट्रीतही खूप सक्रिय होती. या अपघातात आणखी एक भोजपुरी अभिनेत्री सिमरन श्रीवास्तव आणि गायक छोटू पांडे यांचाही मृत्यू झाला आहे. या अपघातात भोजपुरी चित्रपटसृष्टीतील आणखी चार कलाकारांचाही रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. बिहारमधील कैमूरमधील देवकाली गावाजवळ जीटी रोडवर रविवारी संध्याकाळी हा अपघात घडला आहे. सोमवारी सकाळी या अपघातातील मृतांची ओळख पटली आहे. यानंतर पोलिसांनी एक निवेदन जारी करून त्यांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे.
आंचल तिवारीने 'पंचायत २' मधील मुख्य पात्र ‘सान्विका’च्या मैत्रिणीची अर्थात ‘रवीना’ची भूमिका साकारली होती. मोहनिया पोलीस स्टेशन हद्दीतील देवकाली गावाजवळ जीटी रोडवर रविवारी संध्याकाळी ही घटना घडली आहे. मोहनियाचे डीएसपी दिलीप कुमार यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले की, सोमवारी सकाळी मृतांची ओळख पटली असून, भोजपुरी गायक विमलेश पांडे उर्फ छोटू पांडे यांचाही मृतांमध्ये समावेश आहे.
या अपघातामध्ये एकूण ९ जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातात सामील हे सगळे कलाकार एसयूव्हीमधून प्रवास करत होते. पोलिसांनी याबद्दल माहिती देताना सांगितले की, मृतांमध्ये आंचल तिवारी, सिमरन श्रीवास्तव, प्रकाश राम, दधिबल सिंह, अनु पांडे, शशी पांडे, सत्य प्रकाश मिश्रा आणि बागिश पांडे यांचाही मृत्यू झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भोजपुरी गायक छोटू पांडे संपूर्ण टीमसोबत यूपीमध्ये होणाऱ्या एका कार्यक्रमात सहभागी होणार होता. यादरम्यान, त्यांच्या कारला अपघात झाला. त्यांच्या कारला ट्रकने धडक दिली आणि यात दोन अभिनेत्रींसह नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात प्रथम एसयूव्ही कार आणि बाईक यांची टक्कर झाली. त्यामुळे बाईक आणि एसयूव्ही दुसऱ्या लेनमध्ये घुसले. तेव्हा, समोरून भरधाव येणाऱ्या ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात मोटारसायकल चालकासह ९ जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. या अपघातात मृत्युमुखी पडलेले सगळेच भोजपुरी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कलाकार होते. त्यांच्या निधनानंतर भोजपुरी इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे.
संबंधित बातम्या