Poonam PandeyLive Video:अभिनेत्री पूनम पांडे हिचे निधन झालेले नाही. अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करून आपण जिवंत असल्याची माहिती दिली आहे. नुकताच पूनम पांडे हिचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तिने आपल्या मृत्यूची पोस्ट करण्यामागचं कारण सांगितलं आहे. तिने या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘मला तुम्हा सर्वांसोबत काहीतरी महत्त्वाचे शेअर करायचे आहे. मी धडधाकट जिवंत आहे. गर्भाशयाच्या कर्करोगाने माझा बळी घेतलेला नाही.परंतु, दुर्दैवाने,या रोगाचा सामना कसा करावा याबद्दल ज्ञानाच्या अभावामुळे हजारो महिलांनी आपले प्राण गमावले आहेत.
पूनम पांडे पुढे म्हणाली की, 'मी तुम्हाला हे सांगायला इथे आले आहे की, इतर कर्करोगांप्रमाणेच गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोगही टाळता येऊ शकतो. तुम्ही फक्त सर्व चाचण्या वेळच्या वेळी करायला हव्या आणि एचपीव्ही लस घ्यायला हवी. आपण सगळेच हे करू शकतो आणि सर्व्हायकल कॅन्सरमुळे आणखी मृत्यू होणार नाहीत, असे प्रयत्न करू शकतो.’
पूनम पांडेने तिच्या मृत्यूची बातमी जाणूनबुजून एका खास हेतूने पसरवली होती. अभिनेत्री पूनम पांडे हिने गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या लसीचा अर्थात सर्व्हायकल कॅन्सर व्हॅक्सिनचा प्रचार करण्यासाठी तिच्या मृत्यूची बातमी पसरवली होती. लोकांमध्ये त्याबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी तिने हे पाऊल उचलले होते. सर्व्हायकल कॅन्सरवरच्या लसीबद्दल महिलांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी हा स्टंट करण्यात आला होता. नुकतीच या लसीची घोषणा झाली आहे. याच लसीचा प्रचार करण्यासाठी पूनम पांडेने आपल्या निधनाच्या अशा बातम्या पसरवल्या होत्या.
पूनम पांडेच्या कथित निधनाच्या वृत्ताबाबत लोकांच्या मनात सर्व प्रकारचे प्रश्न निर्माण झाले होते. पूनम पांडे हिचे निधन झालेच नव्हते, असे तिच्या चाहत्यांना आधीपासूनच वाटत होते. पूनम पांडेच्या निधनाचे वृत्त समोर आले होते. मात्र, यावर ना तिच्या टीमकडून किंवा ना तिच्या कुटुंबीयांकडून खुलासा आला होता. पूनमच्या पोस्टमधूनच असं वाटतं होतं की, या पोस्टनंतर तिच्याशी निगडीत सगळेच कुठेतरी गायब झाले होते. तिच्या मूळ गावी कानपूरमध्ये तिचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात होते. परंतु, जेव्हा मीडियाने तिच्या पीआरशी बोलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिला ज्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, त्या हॉस्पिटलचे नाव देखील सांगितले गेले नाही. या बातमीची पुष्टी करण्यासाठी तिचे कुटुंब किंवा त्याच्याशी संबंधित कोणीही पुढे आलेले नव्हते.
संबंधित बातम्या