Pooja Sawant Personal Life: आपल्या सहजसुंदर अभिनयाने सगळ्यांनाच भुरळ घालणारी अभिनेत्री म्हणून पूजा सावंत हिचं नाव घेतलं जातं. ‘नीळकंठ मास्तर’, ‘लपाछपी’ आणि ‘दगडी चाळ’ अशा चित्रपटांमधून पूजा सावंत हिने आपल्या दमदार अभिनयाची झलक दाखवली होती. सध्या पूजा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत आहे. लवकरच ती लग्नबंधनात अडकणार आहे. नुकतेच तिने आपल्या होणाऱ्या पतीसोबतचे फोटो शेअर करून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली होती. यानंतर तिच्या होणाऱ्या पती विषयी देखील अनेक चर्चा रंगल्या होत्या. अखेर आता अभिनेत्री पहिल्यांदाच तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलताना दिसली आहे. नुकताच तिने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे.
काहीच दिवसांपूर्वी अभिनेत्री पूजा सावंत हिने सोशल मीडियावर आपल्या होणाऱ्या पतीचा एक पाठमोरा फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये व्यक्तीचा चेहरा दिसत नसल्याने अनेकांनी वेगवेगळे कयास बांधण्यास सुरुवात केली होती. हा व्यक्ती अभिनेता भूषण प्रधान किंवा आदिनाथ कोठारे असल्याचे देखील अनेकांनी म्हटले होते. मात्र, जेव्हा पूजाने तिच्या होणाऱ्या पतीचा चेहरा दाखवला तेव्हा, सगळ्यांच्या या चर्चा बंद झाल्या होत्या. यावर आता पूजा सावंत पहिल्यांदाच मोकळेपणाने बोलली आहे. तिने स्वतःच्या आयुष्याबद्दल आता अनेक खुलासे केले आहेत.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने याबद्दल खुलासा केला आहे. यावेळी बोलताना पूजा सावंत म्हणाली की, ‘मला माहित होतं की, मी हा फोटो शेअर केल्यानंतर अशा चर्चा रंगणार. लोक वेगवेगळे अंदाज बांधणार हे देखील मला माहित आहे. भूषण आणि वैभवसोबतच्या मैत्रीमुळे अनेकांना वाटेल की, ही व्यक्ती त्या दोघांपैकीच एक असावी. पण, अनेकांनी सिद्धेशचा चेहरा एका बाजूने पाहिल्यानंतर तो आदिनाथ असल्याचे म्हटले होते. मात्र, मी हे सगळं जाणूनबुजून केलं होतं. माझ्या वैयक्तिक आयुष्याविषयी फारशी कुणालाच माहित नव्हती. त्यामुळे मी पाठमोरे फोटो टाकण्याचाच निर्णय घेतला होता. योग्य व्यक्ती आपल्या आयुष्यात आली की, सगळं बदलून जातं, हेच माझ्यासोबत घडत आहे.’
अभिनेत्री पूजा सावंत लवकरच लग्न करणार आहे. सिद्धेश चव्हाण असं तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव आहे. सिद्धेश हा मूळचा मुंबईचा असला, तरी नोकरीच्या निमित्ताने तो ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक झाला आहे. लवकरच ही जोडी लग्नबंधनात अडकणार आहे.