मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Phulrani Teaser: अखेर समोर आला सुबोधच्या ‘फुलराणी’चा चेहरा; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून जिंकलंय प्रेक्षकांचं मन!
Phulrani
Phulrani

Phulrani Teaser: अखेर समोर आला सुबोधच्या ‘फुलराणी’चा चेहरा; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून जिंकलंय प्रेक्षकांचं मन!

13 February 2023, 14:29 ISTHarshada Bhirvandekar

Phulrani Teaser Out : सुबोध भावेंची ‘फुलराणी’ कोण असणार असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता. अखेर आज ‘फुलराणी’चा चेहरा समोर आला आहे.

Phulrani Teaser Out : मराठी मनोरंजन विश्व गाजवणारा अभिनेता सुबोध भावे लवकरच एका चित्रपटात रोमँटिक भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची घोषणा फार पूर्वीच करण्यात आली असली, तरी त्याविषयी कोणतीही अपडेट देण्यात आली नव्हती. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. या पोस्टरने चाहत्यांची उत्सुकता आणखीनच वाढवली होती. या चित्रपटात सुबोध भावे मुख्य भूमिकेत झळकणार हे आधीच जाहीर करण्यात आलं होतं. मात्र, ‘फुलराणी’ कोण असणार असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता. अखेर आज (१३ फेब्रुवारी) ‘फुलराणी’चा चेहरा समोर आला आहे. अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर ही ‘फुलराणी’ बनून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय शो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी प्रियदर्शिनी इंदलकर आता मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमात ‘बिवली अवली कोहली’ या पात्रामुळे प्रियदर्शिनी खूपच लोकप्रिय झाली आहे. ‘फुलराणी’च्या निमित्ताने आता ती मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

या टीझरमध्ये ‘प्रीटी प्रिन्सेस’ नावाची एक स्पर्धा होताना दिसत आहे. तर, सुबोध भावे यात एका ब्युटी ग्रुमिंग कोचची भूमिका निभावताना दिसणार आहे. टीझरमध्ये दिवंगत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची झलक देखील पाहायला मिळाली आहे. तर, ‘फुलराणी’ म्हणजेच ‘शेवंता’ बनलेल्या प्रियदर्शिनी इंदलकरचा हटके अंदाज देखील पाहायला मिळत आहे. अभिनेता सुशांत शेलार देखील या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. तर, अभिनेत्री सायली संजीव देखील कॅमिओ करणार आहे.

येत्या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर म्हणजेच २२ मार्चला ही ‘फुलराणी’ मराठी रुपेरी पडद्यावर अवतरणार आहे. या चित्रपटातील ‘विक्रम राजाध्यक्ष’ ही महत्त्वपूर्ण भूमिका अभिनेता सुबोध भावे साकारणार आहे. जगप्रसिद्ध ‘पिग्मॅलिअन’ कलाकृतीने प्रेरित होऊन विश्वास जोशी यांच्या दिग्दर्शनाखाली ‘फुलराणी...अविस्मरणीय प्रेम कहाणी’ हा चित्रपट साकारत आहे. ‘फिनक्राफ्ट मिडिया’ आणि ‘अमृता फिल्म्स’ चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते असून जाई जोशी, विश्वास जोशी, श्री.ए.राव या चित्रपटाचे निर्माते आहेत.