Actress Payel Mukherjee Attacked : बंगाली अभिनेत्री पायल मुखर्जीवर कोलकात्याच्या सदर्न अॅव्हेन्यू येथे दुचाकीवरून आलेल्या गुंडांनी हल्ला केला. अभिनेत्रीने सोशल मीडियावर लाईव्ह करताना आपली व्यथा सांगितली आहे. या लाईव्ह व्हिडीओमध्ये ती कारमध्ये बसलेली दिसत असून, तिच्या चेहऱ्यावर भीतीचे भाव स्पष्ट दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये पायल मुखर्जी आपले अश्रू पुसताना देखील दिसत आहे. या घटनेत आपल्या कारच्या काचा कशा तुटल्या आणि परिस्थिती कशी बिघडू शकली असती, हे अभिनेत्री दाखवत आहे. या व्हिडीओच्या कमेंट सेक्शनमध्ये लोक आता आपली नाराजी व्यक्त करत आहेत.
कोलकात्यात एका डॉक्टरवर बलात्कार आणि हत्येच्या निषेधार्थ झालेल्या आंदोलनादरम्यान पायल मुखर्जीवर हा हल्ला झाला आहे. संपूर्ण शहरात हा संताप स्पष्टपणे दिसून येत आहे. देशभरात लोक निदर्शने करत आहेत. सिनेसृष्टीतील अनेकांनी या धक्कादायक घटनेबाबत आवाज उठवला आहे. पायल मुखर्जीने तिच्या सोबत घडलेल्या या घटनेबद्दल एका लाईव्ह व्हिडीओमध्ये बोलताना तिने सांगितले आहे की, ती कोलकात्याच्या साऊथ एव्हेन्यूमधून जात असताना एका बाईकने तिला धडक दिली.
पायल मुखर्जी तिच्या लाईव्ह व्हिडीओमध्ये सांगत आहे की, या धडकेनंतर तिला धक्का बसला आणि त्यानंतर दुचाकीस्वारांनी तिच्यावर आरडाओरडा करण्यास सुरुवात केली आणि तिला कारची काच खाली करण्यास सांगितले. अभिनेत्रीने तसे न केल्याने त्या लोकांनी बाजूच्या खिडकीची काच फोडली. पायलने सांगितले की, काच फोडल्यानंतर त्यांनी गाडीत तिच्यावर पांढऱ्या पावडरसारखे काहीतरी फेकले. या घटनेवर कारवाई करत पोलिसांनी दुचाकीस्वारांना पकडले असून, मोटारसायकलचे फोटोही सोशल मीडियावर आले आहेत.
अभिनेत्री पायल मुखर्जी हिने बंगाली सिनेमासोबतच साऊथमधील अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'द सीवेज ऑफ रॉबिन हूड', 'गिरगिट' आणि 'श्रीरंगपुरम' हे तिचे तिच्या कारकिर्दीतील काही अप्रतिम चित्रपट आहेत. याशिवाय पायलने हिंदी सिनेमातही काम केले आहे. बॉलिवूड अभिनेता संजय मिश्रासोबत ती 'वो तीन दिन' या चित्रपटात दिसली होती. पायलच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे झाले तर ती ‘अंतरियुध्द’, ‘इन सर्च ऑफ सनशाईन’, ‘नॉन स्टॉप धमाल’ आणि ‘पुल्लू’सारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.