Pawan Kalyan: थिएटरमध्ये जाळ अन् धूर! पवन कल्याणच्या चाहत्यांचे अनोखे प्रेम
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Pawan Kalyan: थिएटरमध्ये जाळ अन् धूर! पवन कल्याणच्या चाहत्यांचे अनोखे प्रेम

Pawan Kalyan: थिएटरमध्ये जाळ अन् धूर! पवन कल्याणच्या चाहत्यांचे अनोखे प्रेम

Aarti Vilas Borade HT Marathi
Feb 11, 2024 08:30 AM IST

Pawan Kalyan Moive: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये पवन कल्याणचा चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांनी अनोख्या पद्धतीने प्रेम व्यक्त केले आहे.

Pawan Kalyan
Pawan Kalyan

दाक्षिणात्य कलाकारांचा अनोखा चाहता वर्ग असल्याचे पाहायला मिळते. हे चाहते एखाद्या अभिनेत्याला देव मानतात तर कधी त्या अभिनेत्याच्या चित्रपटाचा पहिला शो पाहण्यासाठी वाटेल ते करताना दिसतात. सध्या सोशल मीडियावर सुपरस्टार पवन कल्याणच्या चाहत्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये त्याच्या चाहत्यांनी चक्क थिएटरमध्ये आग लावली आहे.

पवन कल्याणचा पुरी जगन्नाथ दिग्दर्शित 'कॅमेरामॅथन गंगाथो रामबाबू' हा चित्रपट २०१२ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता १२ वर्षांनी पुन्हा हा चित्रपट आंध्र प्रदेशमधील नांद्याला येथील थिएटरमध्ये दाखवण्याचा निर्णय एका थिएटर मालकाने घेतला. पण मालकाला हा निर्णय चांगलाच महागात पडला आहे. चित्रपटाच्या शोदरम्यान चाहत्यांनी चक्क थिएटरमध्येच आग लावली आहे.
वाचा: रविंद्र महाजनींना होती जुगाराची सवय, मुलगा गश्मीरने सांगितले कटू सत्य

काही प्रेक्षकांनी 'कॅमेरामॅथन गंगाथो रामबाबू' हा चित्रपट पुन्हा रिलीज करण्यात आल्यानंतर आनंद व्यक्त केला. शो साठी तुफान गर्दी केली. चाहत्यांनी शो सुरु असताना थिएटरमध्ये आग लावली आणि त्याचे फोटो व व्हिडिओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर व्हायरल केले. ANI च्या ट्विटर (X) अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, पवन कल्याणच्या 'कॅमेरामॅथन गंगाथो रामबाबू' या चित्रपटाचा शो सुरु असताना काही प्रेक्षक थिएटरमध्ये पेपर जाळत आहेत आणि त्या आगीचा धूर सगळ्या थिएटरमध्ये पसरला आहे.

दक्षिणेकडे थिएटरमध्ये फटाके फोडणे, खुर्चा तोडणे, सकाळच्या पहिल्या शोसाठी तुफान गर्दी करणे असे प्रकार सरास घडताना दिसत आहेत. अशातच पवन कल्याणच्या चित्रपटाच्या शोचा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. यापूर्वी २०२३मध्ये विजयवाडा येथे काही चाहत्यांनी दारूच्या नशेत एका थिएटरची तोडफोड केली तेव्हा पोलिसांनी त्यांना ताकीदही दिली.

Whats_app_banner