Pathaan: तिकीट खरेदी करूनही ‘पठाण’ बघायला मिळाला नाही; संतप्त चाहत्यांकडून थिएटरमध्ये तोडफोड!
Pathaan Movie : तिकीट खरेदी करून देखील ‘पठाण’ बघायला मिळाला नाही, यामुळे संतापलेल्या प्रेक्षकांनी चित्रपटगृहाची तोडफोड केली.
Pathaan Movie : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा ‘पठाण’ हा चित्रपट नुकताच बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला आहे. या चित्रपटाने थिएटर्समध्ये देखील धुमाकूळ घातला आहे. चित्रपटगृहांबाहेरच्या लांब रांगा बघूनच या चित्रपटाची क्रेझ लक्षात येते आहे. मात्र, या दरम्यान अनेक ठिकाणी गदारोळ माजल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. कोटामधील एका थिएटरमध्ये देखील प्रेक्षकांनी तोडफोड केल्याची घटना घडली आहे. तिकीट खरेदी करून देखील ‘पठाण’ बघायला मिळाला नाही, यामुळे संतापलेल्या प्रेक्षकांनी चित्रपटगृहाची तोडफोड केली.
ट्रेंडिंग न्यूज
कोटामधील या चित्रपटगृहाने आसन क्षमतेपेक्षा अधिक तिकिटांची विक्री केल्याने ही घटना घडली आहे. जास्तीची तिकिटे विकल्याने, प्रेक्षकांना बसण्यास जागाच उपलब्ध नव्हत्या. यामुळे काही प्रेक्षकांना तिकीट असून देखील शाहरुखचा ‘पठाण’ चित्रपट बघता आला नाही. यानंतर संतप्त प्रेक्षकांनी थिएटरमध्ये तोडफोड करत तेथील सामान देखील उचलून नेले. या घटनेचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
या घटनेची माहिती मिळताच भीमगंज मंडी पोलिसांनी घटनास्थळ जाऊन संतप्त प्रेक्षकांशी चर्चा देखील केली. या संपूर्ण घटनेचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चित्रपट पाहता न आल्याने संतप्त झालेल्या लोकांनी तोडफोड करत तेथील, आईस्क्रीम, पॉपकॉर्न आणि इतर वस्तू सोबत नेल्या आहेत. सदर घटना घडताच पोलिसांना पाचारण करावे लागले.
पोलिसांनी या ठिकाणी तपासणी करत संतप्त प्रेक्षकांशी संवाद साधला. यावेळी प्रेक्षक म्हणाले की, ऑनलाईन बुकिंग करताना सीट रिकाम्या असल्याचे दाखवत होते. त्यामुळे लोकांनी तिकीट खरेदी केले. पण ज्यावेळी ऑनलाईन तिकीट विक्री सुरू होती, तेव्हा थिएटर आधीच हाऊसफुल्ल झाले होते. यामुळे तिकीट असताना देखील लोकांना बसायला जागा मिळाली नाही. यानंतर संतप्त नागरिकांनी पैसे परत करण्याची मागणी केली. पोलिसांनी देखील यात मध्यस्थी करत अशा प्रेक्षकांना बुकिंग रद्द करून, त्यांचे पैसे परत करण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत.