मराठी चित्रपटसृष्टीत नवीन आयाम घेऊन येणारा 'विषय हार्ड 'हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून सर्वांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता लागली आहे. अनोख्या प्रेम कथेला फुलवणारा हा चित्रपट प्रेक्षकांना एका बाजूला खळखळून हसवणारा आणि दुसऱ्या बाजूला विचार करायला लावणाराही आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला.
'विषय हार्ड' ही नेहमीची प्रेमकथा नाही कारण त्यातील नायक- नायिकेसमोर एक वेगळीच परिस्थिती निर्माण होते. त्यांचं १२ वर्षांचं प्रेम आहे आणि वाचवायला फक्त ५ तास आहेत आणि परिस्थितीमधील विचित्र संकटांना तोंड देताना जो गोंधळ उडतो, त्यातून हास्यकल्लोळ निर्माण होतो, त्याचबरोबर काही वेळा गंभीर परिस्थितीही निर्माण होते. हे सर्व प्रसंग अतिशय कलात्मक पद्धतीने एकमेकांत गुंफण्यात आले आहेत. या चित्रपटामधून प्रेक्षकांना मानवी जीवनाच्या वेगवेगळ्या रंगांची सफर घडणार आहे. ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागांतील परिस्थितीचे चित्रण त्यामध्ये आहे, त्याशिवाय कुटुंब, समाज, राजकारण अशा सर्वच बाजूंना स्पर्श करणारा हा चित्रपट आहे. केवळ तरुणाईच नव्हे तर सर्वच वयोगटातील प्रेक्षकांना हा चित्रपट आकर्षित करणारा आहे.
वाचा: मिथिलाच्या आयुष्यात नव्या पात्राची एण्ट्री, 'सुख कळले' मालिकेत रंजक ट्विस्ट
पर्ण पेठे या कसलेल्या अभिनेत्रीने आपली नायिकेची भूमिका अतिशय दमदारपणे वठवली आहे. या चित्रपटाद्वारे सुमित हा नवोदित कलाकार लेखक, दिग्दर्शक, नायक आणि निर्माता म्हणून सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. नवोदित असूनही आपली छाप पाडण्यामध्ये तो यशस्वी ठरलेला आहे. या दोघांसोबत हसन शेख, नितीन कुलकर्णी, विपीन बोराटे, प्रताप सोनाळे, भूमी पाटील, चैत्राली इनामदार, आनंद बल्लाळ आदी कलाकारांच्या भूमिकाही उत्कृष्ट झाल्या आहेत.
वाचा: अस्सल मातीतील कुस्ती आणि बैलगाडा शर्यतीचा थरार; 'रांगडा' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
गीत, संगीत, सिनेमॅटोग्राफी, कला, नृत्य, दिग्दर्शन, वेशभूषा, संकलन आदी सर्व पातळ्यांवर चित्रपट दर्जेदार करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ५ जुलै रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्याला भरभरुन प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे.
वाचा: तंत्रज्ञानाच्या मदतीने कुटुंबाला वाचवणारी 'गूगल आई', पाहा उत्सुकता वाढवणारा टीझर