Pankaj Udhas Life Story: हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ गायक पंकज उधास यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच हादरवून सोडले आहे. पंकज उधास यांनी वयाच्या ७२व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. पंकज उधास आता या जगात नसले, तरी त्यांच्या कलेच्या माध्यमातून ते अजरामर ठरले आहेत. पंकज उधास यांचे निधन कर्करोगामुळे झाले आहे. दिग्गज गायकाच्या निधनाने सर्वांनाच दुःख झाले आहे. पण, तुम्हाला माहीत आहे का की, अतिशय लहान वयात कारकीर्द सुरू करण्यापासून ते मोठ्या पडद्यावर यश मिळवण्यापर्यंत पंकज उधास यांचे आयुष्य अगदी एखाद्या फिल्मी कथेप्रमाणे होते.
पंकज उधास यांचा जन्म १७ मे १९५१ रोजी गुजरातमधील सौराष्ट्र येथे झाला. पंकज उधास यांचे प्राथमिक शिक्षण तेथूनच झाले. पण, त्यांना सुरुवातीपासूनच संगीताची आवड होती. त्यामुळे काही काळानंतर पंकज उधास मुंबईला आले. पंकज उधास यांनी आपल्या करिअरची सुरुवात अगदी लहान वयात केली होती. वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी त्यांनी संगीत विश्वात एन्ट्री घेतली. पंकज उधास यांनी अवघ्या ११व्या वर्षी एक गाणे गाऊन ५१ रुपयांचे बक्षीस पटकावले होते. या काळात देशात सर्वत्र भारत-चीन युद्धाचीच चर्चा होती. अशा परिस्थितीत एका स्टेज परफॉर्मन्सदरम्यान पंकज उधास यांनी 'ए मेरे वतन के लोगों' हे गाणे गाऊन सर्वांची मने जिंकली. यावेळी प्रेक्षकांमध्ये उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने भारावून जात पंकज यांना ५१ रुपयांचे बक्षीस दिले होते.
पंकज उधास यांना १९७२मध्ये आलेल्या 'कामना' चित्रपटात पंकज उधास यांना पहिल्यांदा गाण्याची ऑफर मिळाली. या चित्रपटातील 'तुम कभी सामने आ जाओगे' या गाण्याला पंकज उधास यांनी आपला आवाज दिला आहे. लोकांना हे गाणे खूप आवडले. त्यानंतर पंकज उधास यांनी गायनासोबत उर्दू भाषा शिकली आणि अल्पावधीतच ते प्रसिद्ध गझल गायक बनले. पंकज उधास यांच्या काही गझल आणि गाणी आजही लोकांच्या ओठावर आहेत. या यादीत 'चिठ्ठी आयी है', 'चांदी जैसा रंग तेरा सोने जैसे बाल', 'ना कजरे की धार' या गाण्यांचा समावेश आहे.
पंकज उधास यांना गायन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानासाठी अनेक पदव्या देण्यात आल्या. २००६मध्ये भारत सरकारने त्यांना देशाच्या सर्वोच्च पुरस्कारांपैकी एक असलेला ‘पद्मश्री’ देऊन सन्मानित केले. याशिवाय पंकज उधास यांना दादाभाई नौरोजी मिलेनियम अवॉर्ड, स्पेशल अचिव्हमेंट अवॉर्ड असे अनेक पुरस्कार मिळाले होते.
७०च्या दशकात पंकज उधास यांचे मन फरीदा यांच्यावर जडले होते. फरीदा या व्यवसायाने एअर होस्टेस होत्या. दोघांमध्ये मैत्री आणि नंतर प्रेम झाले. पण, या प्रेमादरम्यान धर्माची भिंत आडवी आली. मात्र, पंकज उधास यांनी घरच्यांची समजूत काढली. दोघांनीही आपापल्या कुटुंबाची परवानगी घेऊन लग्नगाठ बांधली होती.
पंकज उधास यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला असून, त्यांना अखेरचा निरोपही मुंबईतच दिला जाणार आहे. पंकज उधास यांच्यावर मुंबईतील वरळी येथील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पंकज उधास यांची मुलगी नायब हिने ही पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये पंकज उधास यांच्या अंत्यसंस्काराची वेळ आणि ठिकाण नमूद करण्यात आले आहे. या कार्डवर लिहिले आहे की, २६ फेब्रुवारी २०२४ रोजी त्यांचे निधन झाले. मंगळवार, २७ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ ते ५ दरम्यान हिंदू स्मशानभूमी, वरळी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
संबंधित बातम्या