Panchayat 3 Review: गेल्या दोन वर्षांपासून प्रत्येकजण ‘पंचायत’ या सीरिजच्या तिसऱ्या सीझनची वाट पाहत होता. अखेर प्रेक्षकांची हीच प्रतीक्षा आता संपली आहे. या नव्या सीझनमध्ये एकाचवेळी आश्चर्य, मनोरंजन, धमाल आणि ड्रामा सर्व काही पाहायला मिळत असून, प्रेक्षकांना नक्कीच आश्चर्यचकित करते. जितेंद्र कुमार, नीना गुप्ता, रघुबीर यादव यांसारख्या मातब्बर कलाकारांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण भारत आणि नोकरशाहीच्या राजकारणावर एक नवा अध्याय सुरू होत असल्याने, ‘पंचायत ३’ यंदा थोडीशी राजकीय बनली आहे. मात्र, प्रेक्षकांचे मनोरंजन होणार हे नक्की आहे.
चंदन कुमार लिखित आणि दिग्दर्शक दीपक कुमार मिश्रा यांनी केलेली ही वेब सीरिज भावनांची लाट घेऊन येते. याचं कथानक आपल्याला रडवतं, हसवतं, सुन्न करतं, नॉस्टॅल्जिक वाटतं आणि त्यांच्या साध्या परंतु साहसी जीवनाचा भाग बनवतं.
‘पंचायत’च्या या तिसऱ्या सीझनची सुरुवात सचिवजींच्या बदलीने होते आणि प्रेक्षकांना जुन्या ‘फुलेरा’ला' परतण्यासाठी ५-१० मिनिटे लागतात. दु:ख हाताळणे, समाजाने एकमेकांना मदत करणे आणि ऐक्याचे महत्त्व या विषयावर सीरिज भाष्य करते. ट्विस्ट आणि टर्न्सबद्दल बोलायचं झालं तर ही सीरिज प्रेक्षकांना निराश करत नाही.
लोकसभा निवडणुकीच्या काळात सुरू असलेल्या राजकीय चर्चेला अनुसरून या सीरिजमध्ये गावाचे राजकारण आणि तळागाळातील भ्रष्टाचाराचा सखोल वेध घेण्यात आला असून, साधे कथानक तंत्र कायम ठेवण्यात आले आहे.
अनुराग सैकिया यांचे संगीत या भावनेत भर घालते. त्यातून कथानकाचा मूड प्रतिबिंबित होतो. टायटल ट्रॅक इंस्ट्रुमेंटल ते रॉक असा आहे, तर बॅकग्राऊंड स्कोअर कथानकाच्या भावनिक भागाशी सुसंगत आहे. सचिवजी आणि रिंकी एकमेकांच्या शेजारी बसलेले असताना वाजणारी शिट्टी असो किंवा अम्मा प्रल्हादला घर साफ करण्यास मदत करतात तेव्हाचा भावनिक ट्रॅक असो, हेच आवाज आणि सूर ‘फुलेरा’चे जीवन अधिक वास्तववादी बनवतात.
कथेचा विचार केला तर कथेला पुढे नेण्यासाठी सहाय्यक कलाकारांना समोर आणण्याचा आणि मुख्य कलाकारांइतकीच स्क्रीन देण्याचा नवा दृष्टिकोन दिग्दर्शकाने आजमावला आहे. ही शैली कथेच्या बाजूने नक्कीच कामी आली आहे. आपापल्या स्टाईलमध्ये आणि पद्धतीने दिग्दर्शक प्रत्येकाला हिरो बनवतो.
भूषण शर्माच्या भूमिकेत अभिनेता दुर्गेश कुमार एक मनोरंजक व्यक्तिमत्त्व आहे. यावेळी, तो त्यांच्या स्थानाच्या मुख्य पात्रांना धमकावतो आणि सीझनमधील सर्वात मजबूत भूमिकांपैकी एक म्हणून चर्चेत येतो. मागील सीझनच्या तुलनेत त्याच्या खऱ्या अभिनय क्षमतेचा चांगला वापर यावेळी करण्यात आला आहे.
'कोणतीही भूमिका छोटी नसते' ही म्हण पंचायत सीझन ३ साठी खरी ठरते. क्रांती देवीच्या भूमिकेत सुनीता राजवार, आमदार चंद्रकिशोर सिंह यांच्या भूमिकेत पंकज झा, विनोदच्या भूमिकेत अशोक पाठक ते माधवच्या भूमिकेत बुल्लू कुमार यांच्यापासून ते अगदी नाममात्र छोट्या भूमिका साकारणाऱ्या कलाकारांनाही अभिनयाची झलक दाखवण्याची आणि चमकण्याची संधी मिळते. बाम बहादूर हे नवे पात्र कथेच्या ताकदीत भर घालते. गणेशचे पुनरागमन हा एक आश्चर्याचा धक्का आणि आनंदाचा क्षण आहे. तो प्रेक्षकाला नॉस्टॅल्जिक करतो आणि कथानकात महत्त्वाची भूमिका बजावतो.
मुख्य कलाकारांबद्दल बोलायचे झाले तर ते सगळेच नेहमीप्रमाणे विश्वासार्ह आणि धमाकेदार दिसले आहेत. ‘अभिषेक त्रिपाठी’च्या भूमिकेत जितेंद्र कुमार, ‘ब्रिजभूषण दुबे’च्या भूमिकेत रघुबीर यादव, ‘मंजू देवी’च्या भूमिकेत नीना गुप्ता, ‘विकास’च्या भूमिकेत चंदन रॉय आणि ‘रिंकी’च्या भूमिकेत संविका यान पुन्हा एकदा पडद्यावर बघायला मजा येते. मात्र, या सीझनमध्ये त्यांच्या पात्रांचा प्रवास काहीसा कमी करण्यात आला आहे.
जितेंद्र या कथेत शांत वातावरण आणतो, तर संविका कथेत निरागस प्रेमाचा अँगल जोडते आणि चंदन शोचा फन मीटर चालू करतो. नीना यांच्या व्यक्तिरेखेने गावाच्या प्रधान पदाची धुरा सांभाळली आणि राजकारणात पतीला मागे टाकले, असे यावेळी दिसत आहे. ते कथेत सविस्तरपणे दाखवलेले नाही. मात्र, ते पाहण्यात नक्कीच मजा आली असती. भविष्यात लेखक या कथानकात आणखी लक्ष देईल, अशी आशा आहे.
मुलाच्या मृत्यूनंतर प्रल्हाद आयुष्याशी कसा सामना करतो, हे जाणून घेण्याची सर्वजण वाट पाहत होते. तर, मेकर्सनी देखील या पात्राला न्याय दिला आणि त्याच्या कथेवरही लक्ष केंद्रित केले. किंबहुना, त्याने आपले आयुष्य कसे सोडले आहे, स्वत:ला दारूत बुडवले आहे हे दाखवण्यापासून ते पुन्हा एकदा आपल्या आजूबाजूला जगण्याचे, हसण्याचे आणि छोटे-छोटे आनंद जोपासण्याचे कारण शोधण्यापर्यंत त्याचे पात्र एक जगण्याची दिशा दाखवणारे आहे. मागील सीझनमधील प्रल्हादची झलक पाहून बरं वाटतं, आणि फैजल सहज अभिनय कौशल्याने प्रभावित करतो.
मालिकेचे लेखन काही ठिकाणी थोडे संथ होते. सीरिज बघताना कधी कधी'कंटाळा देखील येऊ शकतो. मात्र, लेखकाने एक चांगली पटकथा लिहिली आहे, हे लक्षात येते. मात्र, पोस्ट प्रॉडक्शनच्या टप्प्यात काही गोष्टी अंतिम संपादनात पोहोचू शकल्या नाहीत, हे स्पष्ट झाले आहे. अनेक ठिकाणी प्लॉट अर्धवट वाटू शकतो. सरकारविरोधातील संपात सहभागी झालेल्या व्यक्तिरेखेच्या गायब झालेल्या स्पष्टीकरणापासून ते आमदाराच्या मुलीच्या परिचयामागचा विचार या गोष्टी अर्धवट सोडून देण्यात आल्या आहेत.
‘पंचायत ३’मध्ये सगळ्यात जास्त कंटाळवाणं काय असेल तर, ते म्हणजे हा शो मध्येच थोडा ताणलेला दिसतो. किंबहुना, काही प्रेक्षकांना तो विसंगत वाटू शकतो. याचे कारण म्हणजे ग्रामीण भारतातील अनेक प्रश्न, तळागाळातील राजकारण तसेच भावनिक उलथापालथी एकाचवेळी हाताळण्याचा लेखकाचा प्रयत्न आहे.
एकंदरीत सांगायचं झालं तर, ‘पंचायत’ या वेब सीरिजचा तिसरा सीझन काही ठिकाणी संथ असला तरी मनोरंजन, भावना आणि थ्रिल फॅक्टर अजिबात कमी नव्हता. त्यामुळे तुम्ही आधीचे सीझन पाहिले नसतील तर, आता बींज वॉच सुरू करा!