'द काश्मीर फाइल्स' सारखा ब्लॉकबस्टर चित्रपट बनवल्यानंतर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आता 'द व्हॅक्सिन वॉर' घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाले आहेत. या चित्रपटाचा विषय बराच काळ चर्चेत होता. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. ट्रेलरमध्ये नाना पाटेकरांना पाहून सर्वजण चकीत झाले. आता या चित्रपटाची निर्माती पल्लवी जोशीने नाना पाटेकरांचा कास्टिंग कसे झाले हे सांगितले आहे.
'द व्हॅक्सिन वॉर' या चित्रपटात नाना पाटेकर अतिशय महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. करोनावर पहिली प्रतिबंध लस शोधणाऱ्या वैज्ञानिकाची भूमिका ते साकारणार आहेत. आता नाना पाटेकरांची या चित्रपटासाठी निवड कशी झाली याबाबत चित्रपटाती निर्माती अभिनेत्री पल्लवी जोशीने माहिती दिली आहे.
वाचा: वीकेंडला घरी आहात? घरबसल्या ओटीटीवर पाहा ‘हे’ चित्रपट
पल्लवी जोशीने 'द व्हॅक्सिन वॉर' चित्रपटाच्या निमित्ताने एक पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी तिला नाना पाटेकर यांच्या कास्टिंगविषयी प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा पल्लवी जोशी म्हणाली, 'मला वाटलच नाही या चित्रपटासाठी नाना हो म्हणेल. जे झालं ते एकदमच अचानक झालं. विवेकने ठरवलं होतं की चित्रपटात नानाला घ्यायचं. म्हणून मग मी फोन केला आणि सांगितलं की मी-विवेक असा असा चित्रपट बनवतोय. तुला आम्हाला भेटायचं आहे. तेव्हा तो म्हणाला मी पुण्यात आहे. माझ्या शेतावर. तुम्ही तिकडे या. तो सिंहगडच्या पायथ्याशी राहतो. तिकडे आम्ही त्याच्या घरी गेलो.'
पुढे पल्लवी म्हणाली की,'नानाने स्वत: पूर्ण स्वयंपाक केला होता. विवेक शाकाहरी खातो पण प्रोटीनसाठी कधीकधी तो मासे खातो. नानाने आधी विचारलं होतं काय खातो आणि काय नाही. मग त्याने विवेकसाठी माश्याचे वेगवेगळे प्रकार बनवले होते. तो स्वत: ते माझे तळत होता, तो स्वत: आम्हाला वाढत होता. आम्हाला आधी खाऊ घातलं आणि नंतर तो जेवायला बसला. आम्ही तिथे तीन-चार तास होतो. त्यावेळी आम्ही फक्त चित्रपटांविषयी बोलत होतो. नाना मला म्हणाला विषय तर खूप चांगला आहे मला स्क्रिप्ट पाठव, मी एकदा वाचतो. नंतर आम्ही शुटिंगसाठी सुरुवात केली.'
'द व्हॅक्सिन वॉर' या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटात नाना पाटेकर, पल्लवी जोशी, गिरिजा ओक, सप्तमी गौडा, रायमा सेन व अनुपम खेर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. आता हा चित्रपट २८ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे सर्वांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे.
संबंधित बातम्या