Adnan Siddiqui Comment On Fighter: बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांचा नुकताच रिलीज झालेला ‘फायटर’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत चांगली कमाई केली आहे. ‘फायटर’ हा चित्रपट २५ जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाच्या कलेक्शनची सुरुवात चांगली झाली होती. पण, आता त्याचे कलेक्शन काहीसे गडगडताना दिसत आहे. याबाबत पाकिस्तानी अभिनेता अदनान सिद्दीकी याने ‘फायटर’च्या निर्मात्यांची खिल्ली उडवली आहे.
‘फायटर’ या चित्रपटामध्ये पाकिस्तानला खलनायक दाखवल्याबद्दल अदनान सिद्दीकीने चित्रपटाच्या टीमला फटकारले आहे. अभिनेत्याने नुकत्याच केलेल्या एका ट्विटमध्ये म्हटले की, 'तुमच्या फ्लॉप शोनंतर फायटरच्या टीमला एक मोठा धडा मिळाला आहे. तुम्ही तुमच्या प्रेक्षकांच्या बुद्धिमत्तेचा अपमान करू नका, त्यांना अजेंडा म्हणजे काय ते चांगले समजते. निरुपयोगी राजकारणापासून किमान मनोरंजना विश्वाला दूर ठेवा.’
‘फायटर’ चित्रपट रिलीज झाल्यानंतरही अदनानने नाव न घेता ट्विट करून निर्मात्यांना टोमणा मारण्याची ही पहिलीच वेळ नाही. चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर देखील अदनानने चित्रपटाला पाकिस्तानविरोधी म्हटले होते. त्याने आपल्या ट्विटमध्ये लिहिले होते की, ‘बॉलिवूड पाकिस्तानी लोकांना खलनायक म्हणून दाखवत आहे, हे अत्यंत वाईट आहे.’ त्याच्या या ट्विटवर ‘फायटर’चे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी त्याला एक सल्ला दिला होता. सिद्धार्थने अदनानला हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहण्यास सांगितले होते.
‘फायटर’ या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले, तर हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण यात मुख्य भूमिकेमध्ये दिसले आहेत. यासोबतच अनिल कपूर, करण सिंह ग्रोवर आणि संजीदा शेख यांच्याही या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटात सगळ्याच कलाकारांनी एअरफोर्स पायलट्सची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या कथानकात भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध दाखवण्यात आले आहे. या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात २५० कोटींची कमाई केली आहे. यासोबतच हा चित्रपट भारतीय बॉक्स ऑफिसवर २०० कोटींचा टप्पा पार करण्याच्या जवळपास आहे. ‘फायटर’ चित्रपटाने रिलीजच्या दुसऱ्या शुक्रवारी म्हणजेच ९व्या दिवशी ५ कोटी रुपयांची कमाई केली आहे.