PailwaanMarathi Song : ‘आला बैलगाडा’,‘शिवबाच नाव’,‘लैला मजनू’,‘दोस्ती यारी’,‘अप्सरा’ या गाण्यांच्या घवघवीत यशानंतर बिग हिट मीडिया आता आणखी एक नवा धमाका घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आजवर आपण चित्रपट, सीरिजच्या माध्यमातून एखादी कथा पाहिलीच आहे. मात्र, यावेळी एका गाण्यातून पैलवानाची कथा सांगितली जाणार आहे. आपल्या महाराष्ट्राच्या मातीशी घट्ट नातं जोडणार एक मराठमोळ‘पैलवान’गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या गाण्यात अंकित मोहन मुख्य भूमिकेत झळकणार आहे. त्याच्यासोबत भूषण शिवतारे,दीनानाथ सिंग,शंभू आणि आयुष काळे झळकणार आहेत. नुकताच या गाण्याचा प्रोमो सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे.
‘पैलवान’ हे गाणं सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांनी गायलं असून, ब्रम्हा यांनी या गाण्याला संगीतबद्ध केलं आहे. तर, या गाण्याची गीतरचना ब्रम्हा आणि भूषण विश्वनाथ यांनी केली आहे. या गण्याचं दिग्दर्शन मनीष महाजन याने केलं आहे. या गाण्याची निर्मिती हृतिक अनिल मनी आणि अनुष्का अविनाश सोलवट यांनी केली आहे. सध्या सोशल मीडियावर या गाण्याच्या प्रोमोची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे.
निर्माते हृतिक अनिल मनी ‘पैलवान’ गाण्याविषयी बोलताना म्हणाले की, ‘महाराष्ट्राची संस्कृती तसेच आपल्या मातीतलं मराठमोळं लोकसंगीत जगभर पसरवण्यासाठी आम्ही विविध गाणी या रेकॉर्ड लेबलमार्फत प्रदर्शित करत आहोत. अभिनेता अंकित मोहन याने या गाण्यासाठी आपल्या फिटनेसवर संपूर्ण महिनाभर मेहनत केली आहे. तसेच पैलवान दिसण्यापेक्षा पैलवान कश्यापद्धतीने विचार करत असतील, त्यांचं वागण बोलण या सर्वच गोष्टींचा त्यांनी अभ्यास केला आहे. गाण्याच्या प्रोमोला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. असंच प्रेम गाण्यावरही करा हिचं सदिच्छा!’
निर्माती अनुष्का अविनाश सोलवट‘बिग हिट मीडिया’च्या नव्या गाण्याविषयी बोलताना म्हणाली की, ‘मनोरंजन क्षेत्रात काम करण्यासाठी मी फारच उत्सुक असते. आम्ही मराठी संस्कृती गाण्यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवत आहोत आणि सोशल मीडियावरील प्रतिक्रिया पाहता मला खात्री आहे की‘बिग हिट मीडिया’रेकॉर्ड लेबल वरील‘पैलवान’हे गाणं प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस उतरेल. तुमच असंच प्रेम आमच्यासोबत कायम राहू देत.’