Padma Awards 2025 Announcement : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आज ( २५ जानेवारी २०२५) रोजी केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा पद्म पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. यंदा पद्म पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील अनेक दिग्गजांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे लाडके अशोक मामा म्हणजेच ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. गेल्या वर्षी अशोक सराफ यांना महाराष्ट्रभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
दरम्यान, अशोक सराफ यांच्याबरोबरच कलाविश्वातील अनेक मान्यवरांचा पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत. कलाक्षेत्रासाठी महाराष्ट्रातून अच्युत पालव, अशोक सराफ, आश्विनी भिडे - देशपांडे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा केली. गायिका शारदा सिन्हा यांना मरणोत्तर पद्मविभूषण प्रदान करण्यात आले. गायक अरिजीत सिंग, दिग्दर्शक शेखर कपूर, अभिनेते अजित कुमार आणि दिवंगत गायक पंकज उधास यांनाही पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
शनिवारी नरेंद्र मोदी सरकारने देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक असलेल्या २०२५ पद्म पुरस्कारांची घोषणा केली. गृह मंत्रालयाने सात पद्मविभूषण, १९ पद्मभूषण आणि ११३ पद्मश्री पुरस्कार विजेत्यांची घोषणा केली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यावर्षी मार्च-एप्रिलमध्ये राष्ट्रपती भवनात होणाऱ्या समारंभात हे पुरस्कार प्रदान करतील.
पद्मविभूषण पुरस्कार विजेत्यांमध्ये प्रसिद्ध लोकगायिका शारदा सिन्हा यांचा समावेश आहे, ज्यांना मरणोत्तर भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला आहे. छठ गाण्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या शारदा यांचे गेल्या वर्षी ५ नोव्हेंबर रोजी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) निधन झाले होते. संगीत विश्वातील योगदानाबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर अशोक सराफ यांची पहिली प्रतिक्रिया -
पद्मश्री पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. गेल्यावर्षी महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाल्यानंतर महाराष्ट्र मिळाल्याचं समाधान होतं. आता एक स्टेप पुढे गेली आहे. राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याचा आनंद व प्रचंड समाधान आहे. हा पुरस्कार म्हणजे याची पोचपावती आहे की, मी काहीतरी चागलं केलंय. विशेष म्हणजे मला पुरस्कार मिळाल्यानंतर महाराष्ट्रातील जनतेला जो आनंद झालाय त्याचे मला खूप समाधान आहे. तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार..
पद्मभूषणबद्दल बोलायचे झाले तर कला क्षेत्रातून हा सन्मान मिळालेल्या व्यक्तींमध्ये अनंत नाग, जतिन गोस्वामी, दिवंगत गायक पंकज उधास, चित्रपट निर्माते आणि शेखर कपूर यांसारख्या नावांचा समावेश आहे.
११३ पद्मश्री पुरस्कारांपैकी अद्वैत चरण गडनायक, अच्युत रामचंद्र पालव, अशोक लक्ष्मण सराफ, अश्विनी भिडे देशपांडे, बॅरी गॉडफ्रे जॉन, गोकुळचंद्र दास, फारुख अहमद मीर, दुर्गाचरण रणबीर, भरत गुप्त, गुरुवायूर दोराई, हरचंदनसिंग भट्टी, हरजिंदर सिंग श्रीनगर वाले, हसन रघु, जसपिंदर नरुला, जयनाचरण बठारी आणि निर्मला देवी यांना सन्मानित करण्यात आले आहे.
गायक अरिजीत सिंग आणि रिकी केज यांना संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल हा सन्मान देण्यात आला आहे.
कला, समाजकार्य, सार्वजनिक व्यवहार, विज्ञान व अभियांत्रिकी, व्यापार व उद्योग, वैद्यकीय, साहित्य व शिक्षण, क्रीडा, नागरी सेवा अशा विविध शाखांमध्ये हे पुरस्कार दिले जातात. दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला या घोषणा केल्या जातात.
संबंधित बातम्या