Pataal Lok 2: ‘पाताल लोक’ वेब सिरिजच्या प्रमोशन दरम्यानच धडकली वाईट बातमी; मुख्य अभिनेता जयदिप अहलावटला पितृशोक
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Pataal Lok 2: ‘पाताल लोक’ वेब सिरिजच्या प्रमोशन दरम्यानच धडकली वाईट बातमी; मुख्य अभिनेता जयदिप अहलावटला पितृशोक

Pataal Lok 2: ‘पाताल लोक’ वेब सिरिजच्या प्रमोशन दरम्यानच धडकली वाईट बातमी; मुख्य अभिनेता जयदिप अहलावटला पितृशोक

Jan 14, 2025 08:30 PM IST

‘पाताल लोक-२’ वेब सिरिजचा प्रसिद्ध अभिनेता जयदीप अहलावत याला पितृशोक झाला आहे. या वेब सिरिजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेल्या जयदिपला सर्व कार्यक्रम रद्द करून दिल्लीला परत जावे लागले.

अभिनेता जयदीप अहलावटला पितृशोक
अभिनेता जयदीप अहलावटला पितृशोक (Instagram)

'राझी', 'गँग्स ऑफ वासेपूर' आणि 'पाताल लोक' या वेब सिरिजमधील दमदार भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेला अभिनेता जयदीप अहलावट याला पितृशोक झाला आहे. वडिलांच्या निधनाचे वृत्त कळताच जयदीप अहलावट दिल्लीला रवाना झाले आहे.

जयदीप अहलावट याच्या वडिलांच्या निधनानंतर त्याच्या टिमने एक निवेदन जारी केले आहे. ‘जयदिप अहलावटच्या वडिलांच्या निधनाची बातमी जाहीर करताना आम्हाला अत्यंत दु:ख होत आहे. जयदीप आणि त्याच्या कुटुंबीयांवर कठीण प्रसंग कोसळला आहे.’ असं या निवेदनात म्हटलं आहे.

जयदीप अहलावट याचे वडील दयानंद अहलावट हे निवृत्त शिक्षक होते. अभिनय क्षेत्रात करिअर करता यावे यासाठी त्याच्या वडिलांनी पाठिंबा दिला होता, असं जयदीप अहलावट याने एका मुलाखतीत सांगितलं होतं. 'फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) मध्ये प्रवेश घ्यायचा असल्याचे जेव्हा त्याने आपल्या वडिलांना सांगितले तेव्हा त्याच्या वडिलांना प्रोत्साहन दिले होते. जर नापास झाला तर तुला शेती करावी लागेल, असं त्याच्या वडिलांनी त्यावेळी सांगितल्याचे जयदिपने या मुलाखतीत म्हटले होते.

जयदीप अहलावट सध्या त्याच्या ‘पाताल लोक’ या तुफान लोकप्रिय ठरलेल्या वेब सिरिजच्या दुसऱ्या भागाचे प्रमोशन करतोय. या वेब सिरिजमध्ये तो इन्स्पेक्टर हाथीराम चौधरीच्या भूमिकेत दिसणार आहे. नवीन सीझनमध्ये हाथी राम चौधरी (जयदीप अहलावट) आणि त्याच्या टीमच्या व्यक्तिरेखेवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. 

‘पाताल लोक-२’ वेब सिरिजच्या कथानकाबाबत निर्मात्यांनी गूढ कायम ठेवले आहे. अविनाश अरुण ढवरे याने ‘पाताल लोक-२’ या वेबसिरिजचे दिग्दर्शिन केले आहे. नव्या सिझनमध्ये अभिनेत्री तिलोत्तमा शोम, अभिनेता नागेश कुकुनूर आणि जाहनू बरुआ यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. येत्या १७ जानेवारीला प्राईम व्हिडिओवर ‘पाताल लोक-२’ हा क्राइम ड्रामा प्रीमियर होणार आहे.

अभिनेता जयदीप अहलावट याने ‘रईस’, ‘राजी’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘गँग्स ऑफ वासेपूर’ या वेब सिरिजमधील शाहिद खानची त्याची भूमिका गाजली होती. ‘पाताल लोक’मधील इन्स्पेक्टर हाथीराम चौधरीच्या भूमिकामुळे जयदीप अहलावटला अनेक पुरस्कार मिळाले होते.

Whats_app_banner