Paani Marathi Movie Teaser Out: महाराष्ट्रच नव्हे, तर देशभरातील काही भागांमध्ये सध्या पाण्याची अतिशय भीषण स्थिती दिसत आहे. अनेकांना पिण्यासाठीचे पाणी मिळवण्यासाठी देखील प्रचंड संघर्ष करावा लागतो. कित्येक किलोमीटर दूरवर जाऊन थोडेसे पाणी मिळवावे लागते. आपल्या भविष्याचे हेच भीषण वास्तव ‘पाणी’ या नव्या मराठी चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘पाणी’ या चित्रपटाची निर्मिती बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ अर्थात प्रियांका चोप्रा हिने केली आहे. तर, या चित्रपटाचे दिग्दर्शन आदिनाथ कोठारे याने केले आहे.
आजवर प्रेक्षकांनी आदिनाथ कोठारेला एक उत्तम अभिनेता म्हणून पाहिले आहे. तर, ‘पाणी’ या चित्रपटातून तो पहिल्यांदाच दिग्दर्शन करताना दिसणार आहे. या चित्रपटाच्या टीझरमध्ये सुरुवातीलाचा एक व्यक्ती अतिशय खोल विहिरीत खाली उतरून अगदी तांब्याभर पाणी शोधून काढताना दिसत आहे. विहीर मोठी असली तरी ती संपूर्ण कोरडी झाली आहे. पुढे काही लोक एक हंडा पाण्यासाठी अनेक मैल चालून जाताना दिसले आहे. तर, या टीझरमध्ये आमिर खानच्या ‘सत्यमेव जयते’ या शोची झलक देखील पाहायला मिळाली आहे.
या चित्रपटाबद्दल बोलताना प्रियांका चोप्रा म्हणाली की, ‘जगभरातील प्रेक्षकांपर्यंत 'पाणी' हा चित्रपट पोहोचवण्याचा आनंद शब्दांत सांगता येणार नाही. या चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण मुद्दा उलगडणार आहोत. हा चित्रपट खूप खास आहे. निर्मिती प्रक्रिया आव्हानात्मक असली तरी तो आपल्या काळासाठी अतिशय प्रासंगिक आहे. या चित्रपटातील पात्राने आपल्या आजूबाजूच्या सर्वांच्याच जीवनात क्रांतिकारी बदल घडवून आणला आहे. हा प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी असणार आहे’
तर, आदिनाथ कोठारेचे कौतुक करताना प्रियांका चोप्रा म्हणाली की, ‘आदिनाथ यांचे दिग्दर्शन विशेष उल्लेखनीय आहे आणि या संपूर्ण टीमच्या कठोर मेहनतीबद्दल मी त्यांची आभारी आहे. हा माझा चौथा मराठी चित्रपट आहे आणि राजश्री एंटरटेनमेंट आणि कोठारे व्हिजन प्रायव्हेट लिमिटेड या दोन प्रतिष्ठित निर्मिती कंपन्यांसोबत सादर करण्याचा आनंद मला होत आहे.’
नितीन दीक्षित आणि आदिनाथ कोठारे यांची कथा असणाऱ्या 'पाणी'मध्ये आदिनाथ कोठारे, रुचा वैद्य, सुबोध भावे, रजित कपूर, किशोर कदम, नितीन दीक्षित, सचिन गोस्वामी, मोहनाबाई, श्रीपाद जोशी, विकास पांडुरंग पाटील अशी तगडी स्टारकास्ट आहे. तर, नेहा बडजात्या, दिवंगत रजत बडजात्या, प्रियांका चोप्रा जोनस, डॅा. मधू चोप्रा या चित्रपटाचे निर्माते आहेत. तर महेश कोठारे, सिद्धार्थ चोप्रा या चित्रपटाचे सहयोगी निर्माते आहेत.