Oscars 2024 Nitin Desai: जगभरातील दिग्गजांचे लक्ष लागून राहिलेला ९६वा अकादमी पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या प्रतिष्ठित पुरस्कारांमध्ये 'ओपेनहायमर' या चित्रपटाने ७ ऑस्कर पुरस्कार जिंकले आहेत. सिलियन मर्फीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार आणि ख्रिस्तोफर नोलनला नोलनला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला आहे. ‘पुअर थिंग्ज’साठी अभिनेत्री एम्मा स्टोनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. एकीकडे जगभरातील दिग्गजांचा सन्मान सोहळा सुरू असताना, दुसरीकडे याच सोहळ्यात मराठमोळे कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांना श्रद्धांजली देखील वाहण्यात आली. यावेळी व्हिडीओ पाहून भारतीय चाहत्यांचे डोळे देखील पाणावले. ऑस्कर २०२४मध्ये भारतीय कला दिग्दर्शक नितीन देसाई आणि दक्षिण कोरियन अभिनेता ली सन क्यून यांच्यासह अनेक दिग्गज व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली.
‘ऑस्कर २०२४’ अवॉर्ड्स दरम्यान ‘इन मेमरीज’ सेक्शन एक व्हिडीओ प्ले करण्यात आला, ज्यामध्ये कला दिग्दर्शक नितीन देसाई आणि अभिनेता ली सन क्यूं यांची आठवण काढली गेली. या व्हिडीओमध्ये नितीन देसाई यांचे पूर्ण नाव नितीन चंद्रकांत देसाई दाखवण्यात आले आहे. यासोबतच त्यांची एक छोटीशी व्हिडीओ क्लिपही दाखवण्यात आली. या क्लिपमध्ये नितीन देसाई यांचा फोटोही दिसत होता. नितीन देसाई यांच्या चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल ऑस्करने त्यांना आदरांजली वाहिली.
नितीन देसाई आणि ली सन क्युन व्यतिरिक्त, मेमोरिअम सेक्शनमध्ये श्रद्धांजली वाहण्यात आलेल्या दिवंगत कलावंतांमध्ये टीना टर्नर, ‘फ्रेंड्स’ स्टार मॅथ्यू पेरी, संगीतकार बिल ली, अभिनेत्री चिता रिवेरा, अभिनेता रायन ओ'नील, संगीत दिग्दर्शक रिचर्ड लुईस, अभिनेत्री ग्लेंडा जॅक्सन, हॅरी बेलाफोंटे, पी-वी हर्मन अभिनेता पॉल रुबेन्स, मेलिंडा डिलन, नॉर्मन ज्यूसन, पाइपर लॉरी, ज्युलियन सँड्स, कार्ल वेदर्स, ट्रीट विल्यम्स, बर्ट यंग यांचाही समावेश होता.
मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकात देसाई यांनी २ ऑगस्ट २०२३ रोजी वयाच्या ५७व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी गळफास घेऊन आपले आयुष्य संपवले. नितीन देसाई हे भारतीय कला दिग्दर्शक, प्रॉडक्शन डिझायनर आणि चित्रपट आणि दूरदर्शन निर्माता होते. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील कामासाठी ते आजही नावाजले जातात. ‘हम दिल दे चुके सनम’, ‘लगान’, ‘देवदास’, ‘जोधा अकबर’ आणि ‘प्रेम रतन धन पायो’ यांसारख्या चित्रपटांमधील भव्यदिव्य सेट्ससाठी ते विशेष प्रसिद्ध होते. आपल्या २० वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी आशुतोष गोवारीकर, विधू विनोद चोप्रा, राजकुमार हिरानी आणि संजय लीला भन्साळी यांसारख्या दिग्दर्शकांसोबत काम केले होते.
संबंधित बातम्या