मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Indian Movies Oscars: भारतीय चित्रपटांना कधी मिळाली होती ऑस्करमध्ये पहिली एन्ट्री? तुम्हाला माहितीय का?

Indian Movies Oscars: भारतीय चित्रपटांना कधी मिळाली होती ऑस्करमध्ये पहिली एन्ट्री? तुम्हाला माहितीय का?

Harshada Bhirvandekar HT Marathi
Mar 11, 2024 07:41 AM IST

Indian Movies History In Oscar: आजवर एकही भारतीय चित्रपट सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून ऑस्कर जिंकू शकला नसला तरी, आपली छाप सोडण्यात यशस्वी झाला आहे.

Indian Movies History In Oscar
Indian Movies History In Oscar (REUTERS)

Indian Movies History In Oscar: चित्रपटसृष्टीचा सर्वात मोठा पुरस्कार सोहळा 'ऑस्कर २०२४' नुकताच पार पडला आहे. यंदा कोण कोण ऑस्कर जिंकणार याकडे संपूर्ण जगाच्या नजरा खिळल्या होत्या. गेल्या वर्षी या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात एसएस राजामौली यांच्या 'आरआरआर' या चित्रपटाने पुरस्कार जिंकून संपूर्ण जगात भारताची मान अभिमानाने उंचावली होती. या चित्रपटातील 'नाटू नाटू' या गाण्याने देशातच नव्हे, तर परदेशातही खळबळ उडवून दिली होती. मात्र, भारतीय चित्रपटांना ऑस्कर पुरस्कारांच्या शर्यतीत पहिली एन्ट्री कधी मिळाली? तुम्हाला माहित आहे का?.

यावेळी ऑस्कर २०२४मध्ये पुन्हा एकदा हॉलिवूड चित्रपटांचे वर्चस्व कायम असल्याचे दिसून आले आहे. ‘ओपेनहायमर’ आणि ‘पुअर थिंग्ज’सह अनेक चित्रपटांनी यंदा अनेक पुरस्कार पटकावले आहेत. मात्र, ऑस्कर पुरस्कारांच्या इतिहासात आपली छाप सोडण्यात भारतीय चित्रपटही मागे राहिलेले नाहीत. आजवर एकही भारतीय चित्रपट सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून ऑस्कर जिंकू शकला नसला तरी, आपली छाप सोडण्यात यशस्वी झाला आहे. आतापर्यंत ऑस्कर मिळवण्याच्या शर्यतीमध्ये अनेक भारतीय चित्रपटांचा समावेश झाला आहे.

भारतीय चित्रपटांना कधी मिळाली ऑस्करमध्ये पहिली एन्ट्री?

‘ऑस्कर’ पुरस्कारांची सुरुवात १९२७मध्ये झाली, तर, प्रत्यक्ष पुरस्कार वितरण १९२९मध्ये सुरू झाले. परंतु, भारतीय चित्रपटांनी १९५७मध्ये प्रथमच अकादमी पुरस्कारात प्रवेश मिळवला. मेहबूब खान दिग्दर्शित 'मदर इंडिया' या चित्रपटाला पहिल्यांदाच ३०व्या अकादमी पुरस्कारांसाठी नामांकन मिळाले होते. या चित्रपटात सुनील दत्त, नर्गिस आणि राजेंद्र कुमार मुख्य भूमिकेत होते. ‘मदर इंडिया’ हा भारतातून ऑस्करमध्ये एन्ट्री मिळवणारा पहिला चित्रपट होता.

Oscars 2024 Winners: कुणी मारली ऑस्कर २०२४च्या शर्यतीत बाजी? पाहा यंदाच्या ऑस्कर विजेत्यांची यादी!

ऑस्कर शर्यतीत सामील झालेयत ‘इतके’ चित्रपट

'मदर इंडिया'नंतर दरवर्षी ऑस्कर पुरस्कारांसाठी भारतीय चित्रपट पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली. तेव्हापासून ते आतापर्यंत सुमारे ५६ चित्रपट ऑस्कर पुरस्कारासाठी पाठवण्यात आले आहेत. ‘गाईड’ (३८वा ऑस्कर), ‘उपर’ (४५वा ऑस्कर), ‘सौदागर’ (४६वा ऑस्कर), ‘नायकन’ (६०वा ऑस्कर), ‘बँडिट क्वीन’ (६७वा ऑस्कर), ‘देवदास’ (७५वा ऑस्कर), ‘बर्फी’ (८५वा ऑस्कर), ‘जल्लीकट्टू’ (९३वा ऑस्कर) आणि २०१८ (९६वा ऑस्कर) अशा काही चित्रपटांचा ऑस्कर शर्यतीत सहभाग होता.

हिंदीशिवाय तमिळ, तेलगू, मल्याळम, मराठी, बंगाली, उर्दू आणि गुजरातीसह अनेक चित्रपट ऑस्कर पुरस्कारासाठी पाठवण्यात आले आहेत. दरवर्षी अनेक चित्रपट ऑस्करसाठी फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या ज्युरीकडे पाठवले जातात. मात्र, आतापर्यंत केवळ ४ चित्रपटांचा प्रवास अकादमी पुरस्कारापर्यंत पोहोचला आहे.

भारतीय चित्रपटांनी गाजवलेला ऑस्कर २०२३

१९५७मध्ये ऑस्कर पुरस्कारांच्या नामांकन यादीत ‘मदर इंडिया’ या चित्रपटाचे नाव आले होते. यानंतर १९८८मध्ये ‘सलाम बॉम्बे’, २००१मध्ये ‘लगान’, आणि २०२२मध्ये ‘छेल्लो शो’ या चित्रपटांचीहि निवड झाली होती. मात्र, पुरस्कार मिळवण्यात हे चित्रपट मागे राहिल. मात्र, भारतासाठी अभिमानाचा क्षण म्हणजे २०२३चा ऑस्कर पुरस्कार होता. या पुरस्कार सोहळ्यात साऊथ सुपरस्टार राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांच्या 'आरआरआर' चित्रपटातील 'नाटू नाटू' या गाण्याला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचा ‘ऑस्कर २०२३’ पुरस्कार मिळाला. तर, भारतीय चित्रपट निर्माती गुनीत मोंगा यांच्या 'द एलिफंट व्हिस्पर्स' हा लघुपट सर्वोत्कृष्ट माहितीपट प्रकारात विजेता ठरला.

WhatsApp channel