बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये आमिर खान आणि किरण राव ही जोडी वेगवेगळ्या चित्रपटांच्या निर्मितीसाठी विशेष ओळखली जाते. आता त्यांच्या 'लापता लेडीज' या चित्रपटाने ऑस्करच्या शर्यतीमध्ये जागा मिळवळी आहे. जवळपास २९ चित्रपटांना टक्कर देत सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटासाठी या चित्रपटाची निवड झाली आहे. आता हा चित्रपट नेमका काय आहे? या चित्रपटाची कथा काय आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
'लापता लेडीज' या चित्रपटात एका भारतातील ग्रामिण भागातील कथा दाखवण्यात आली आहे. या गावात राहणाऱ्या एका साध्या-सरळ युवकाचे लग्न होते. तो लग्नासाठी मुलीच्या गावी लांबचा प्रवास करुन जातो. लग्नानंतरचे विधी करुन तो घरी परतत असतो. ट्रेनमध्ये त्याच्या पत्नीसारखीच आणखी एक मुलगी नवरीच्या पोषाखात असते. तिने देखील डोक्यावर लाल रंगाचा पदर घेतलेला असतो. काही वेळानंतर या नवविवाहीत मुलींचा आदलाबदली होते. पण जेव्हा त्या युवकाला कळते की ही आपली पत्नी नाही तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. त्यानंतर तो आपल्या पत्नीला शोधण्यासाठी प्रचंड प्रयत्न करतो. शेवटी त्याचे सर्व प्रयत्न यशस्वी ठरतात.
लापता लेडीज हा चित्रपट मार्च महिन्यात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची निर्मिती किरण राव आणि आमिर खानने केली आहे. या चित्रपटात नितांशी गोयल, प्रतिभा रांता आणि स्पर्श श्रीवास्तव मुख्य भूमिकेत आहेत. तसेच त्यांच्यासोबत रवि किशन, छाया कदम आणि गीता अग्रवाल शर्मा देखील दिसत आहेत.
'लापता लेडीज' या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आमिर खानची पूर्वाश्रमीची पत्नी किरण रावने पुन्हा एकदा आपली ठळक ओळख निर्माण केली आहे. तब्बल १४ वर्षानंतर किरण राव कमबॅक करताना दिसली. तिने 'धोबी घाट' या चित्रपटाचे शेवटचे दिग्दर्शन केले होते. आता सध्या सर्वत्र किरणच्या लापता लेडीज या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटाने ऑस्करच्या शर्यतीमध्ये जागा मिळवल्यामुळे सर्वजण आनंद व्यक्त करत आहेत.
वाचा: 'लाफ्टर शेफ'च्या सेटवर रीम शेखनंतर राहुल वैद्यचा अपघात, चेहऱ्यावर आली आग
या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यावर बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. पण जेव्हा हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला तेव्हा मात्र जोरदार चर्चा रंगली. आता या चित्रपटाने बॉलिवूडमधील हिट चित्रपट 'अॅनिमल', मल्याळम राष्ट्रीय पुरस्कार विजेता 'आट्टम', कान्स पुरस्कार विजेता 'ऑल वी इमेजिन अॅज लाइट' चित्रपट, तमिळ चित्रपट 'महाराजा', तेलुगू सिनेमा 'कल्की २८९८ एडी', बॉलिवूड चित्रपट 'स्वातंत्र्यवीर सावरकर', 'आर्टिकल ३७०' आणि इतर काही हिट २९ चित्रपटांना मागे टाकत सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटासाठी नामांकन मिळवले आहे.