गेल्या काही दिवसांपासून मराठमोळे अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या आगामी चित्रपटाती चर्चा रंगली आहे. या चित्रपटात एका वृद्ध व्यक्तीची व्यथा दाखवण्यात येणार आहे. चित्रपटाची घोषणा केल्यापासूनच कोणते कलाकार भूमिका साकारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता या चित्रपटात कोण कोण दिसणार हे स्पष्ट झाले आहे.
'जुने फर्निचर' या चित्रपटात ७१ वर्षीय एका वृद्ध व्यक्तीची कथा दाखवण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. या टीझरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. टीझरमधील बॅकग्राऊंडला येणारा भारदस्त आवाज, दमदार व्यक्तीमहत्वने प्रेक्षकांचे लक्ष वेधले होते. तसेच महेश मांजरेकर यांच्यासोबत कोणते कलाकार दिसणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता या कलाकारांची नावे समोर आली आहे.
वाचा: देवीच्या मंदिरात जुळणार आकाश आणि वसूमध्ये सूत? 'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेत नवा ट्विस्ट
'जुने फर्निचर' या चित्रपटात महेश मांजरेकर यांच्यासोबत समीर धर्माधिकरी, डॉ. गिरीश ओक, विजय निकम, संतोष मिजगर, अलका परब, शरद पोंक्षे हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तसेच त्यांच्यासोबत ओंकार भोजने, शिवाजी साटम हे देखील स्क्रीन शेअर करणार आहेत. मराठी चित्रपटसृष्टीमधील बड्या कलाकारांची भट्टी जमलेली पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन, पटकथा, संवाद हे महेश मांजरेकर यांनी लिहिले आहेत. त्यामुळे सर्वांना या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. हा चित्रपट २६ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.
वाचा: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये सहभागी व्हायचे? मग ही बातमी नक्की वाचा
'जुने फर्निचर' या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक महेश मांजरेकर म्हणाले की, "जुन्या फर्निचरमध्ये किती ताकद असते, हे दाखवण्याचा प्रयत्न या चित्रपटाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. एका ज्येष्ठ नागरिकाची कथा, त्याचा संघर्ष आणि समाजाशी असलेला लढा यात दाखवण्यात आला आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक अशा प्रकारच्या परिस्थितीला सामोरे जात असतील, परंतु ही प्रकरणे समोर येत नाहीत. मी म्हणेन प्रत्येक तरूणाने आपल्या पालकांसोबत हा चित्रपट पाहावा, जेणे करून त्यांचा दृष्टिकोन बदलेल.''