मराठी चित्रपटसृष्टीत खलनायक हे पात्र म्हटलं की सर्वात पहिला डोळ्यासमोर ज्यांचा चेहरा उभा राहतो ते म्हणजे अभिनेते निळू फुले. पडद्यावरचा हा खलनायक खऱ्या आयुष्यात किती संवेदनशील माणूस होता याची अनेक उदाहरणे आहेत. आज आम्ही तुम्हाला असाच एक किस्सा सांगणार आहोत ज्याविषयी फार कमी लोकांना माहिती आहे. निळू फुले यांनी स्वत:च्या आईला अन्न देण्यास नकार दिला होता. पण त्यामागे काय नेमके काय कारण होते? चला जाणून घेऊया...
समकालीन व लोकप्रिय अभिनेते राम नगरकर यांनी आपल्या 'रामनगरी' या आत्मचरित्रात निळू फुले यांच्याविषयी लिहिले आहे. त्यांनी निळू फुले आणि त्यांच्या आईसोबत घडलेल्या एका घटनेचा उल्लेख केला आहे. अभियासोबतच निळू फुले सामाजिक कार्यात मोठा सहभाग घेत होते. ते राष्ट्रीय सेवा दलाचे सदस्य होते. राष्ट्रीय सेवा दला तर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या उपक्रमांमध्ये ते हिरीरीने भाग घ्यायचे.
त्याकाळी राम नगरकर आपल्या नव्या दुकानाच्या उदघाटनासाठी पुण्यात गेले होते. पुण्यात ते निळू फुले यांच्या वस्तीमध्ये देखील गेले होते. त्या काळात महाराष्ट्रात मोठा दुष्काळ आला होता. सेवादलाने पुण्यातून धान्य गोळा करून ते दुष्काळग्रस्त भागात वाटण्याचा उपक्रम हाती घेतला होता. निळू भाऊंनी त्यासाठी विशेष पुढाकार घेतला होता. त्यांच्या पुण्याच्या घरी धान्याची जवळ जवळ ५ पोती जमा झाली होती. त्या काळात राम नगरकर निळू यांच्या घरी राहायला तसेच जेवायला होते. ते राम यांच्याकडून कधीच पैसे घेत नसत.
एक दिवस निळू फुलेंच्या आईसमोर समस्या उभी राहिली होती. घरात १२ -१३ लोकांचे कुटुंब आणि घरात अन्नाचा दाणा शिल्लक नव्हता. जवळचे पैसेदेखील संपले होते. निळू आणि नगरकर कुठेतरी बाहेर जायला निघाले होते, तेव्हा आईने पैसे मागितले होते. त्यावर निळू म्हणाले, ''सगळा पगार तुलाच देतो, आता पैसे कुठून आणणार? शेजाऱ्यांकडे मागून बघा." त्यावर आईने, "आधीच शेजाऱ्याकडून घेतलेलं परत दिलं नाही आहे, आता पुन्हा मागितलं तर कोण देणार.." राम हे सर्व दाराबाहेर उभे राहून ऐकत होते.
निळू यांना पुन्हा आईने आवज दिला आणि घरात असलेले धान्य वापरण्याची परवानगी मागितली. तसेच पैसे आल्यावर त्यात पुन्हा धान्य ठेवू असे देखील सांगितले. पण निळू यांना ते ऐकून राग आला. हा प्रकार ऐकून राम नगरकरांना पश्चाताप झाला, एकतर या घरात पैशाची... अन्नाची तंगी आहे आणि त्यात खिशात हजार रुपये असताना देखील मी इतके दिवस फुकटच बसून खात होतो. निळू यांनी त्यांच्या परिस्थितिची वाच्यता त्यांच्यासमोर कधी केली नाही.
वाचा: पहिल्या पत्नीला दागिन्यांसह दिला अग्नी, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पहिल्या पत्नीविषयी माहिती आहे का?
निळू फुले यांचा संपूर्ण संवाद ऐकल्यावर राम हे समोर आले. त्यांनी खिश्यातील सर्व पैसे निळू फुलेंच्या हातावर टेकवले. निळू यांनी ते घेण्यास नकार दिला. त्यावर नगरकर भडकले व म्हणाले जर तू पैसे घेतले नाहीस तर मी घर सोडून निघून जाईन. शेवटी खूप हट्ट केल्यांनतर अखेर निळू फुलेंनी हे पैसे घेतले. पडद्यावरचा हा खलनायक खऱ्या आयुष्यात मात्र महानायक होता असे म्हणता येईल.
संबंधित बातम्या