Om Puri: असे लोक कसे अभिनेता बनतात?; शबाना आझमींनी केली होती ओम पूरी यांच्या लूकवर कमेंट
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Om Puri: असे लोक कसे अभिनेता बनतात?; शबाना आझमींनी केली होती ओम पूरी यांच्या लूकवर कमेंट

Om Puri: असे लोक कसे अभिनेता बनतात?; शबाना आझमींनी केली होती ओम पूरी यांच्या लूकवर कमेंट

Aarti Vilas Borade HT Marathi
Published Oct 18, 2024 07:36 AM IST

Om Puri: बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेते ओम पुरी यांची आज जयंती. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्याविषयी काही खास गोष्टी...

Om Puri Birth Anniversary
Om Puri Birth Anniversary

आपल्या सशक्त अभिनयाने बॉलिवूडमध्ये स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण करणारे अभिनेते म्हणजे ओम पुरी. आज, १८ ऑक्टोबर रोजी ओम पुरी यांची जयंती. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्याविषयी काही खास गोष्टी. ओम पुरी यांचे बालपण अत्यंत गरिबीत गेले. त्यांना लहानपणापासूनच खूप कष्ट करायला लागले होते. वडील तुरुंगात असल्यामुळे ओम पुरी यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी पडली होती. त्यामुळे मिळेल ते काम करुन ओम पुरी गुजारा करत असत.

वयाच्या ६व्या वर्षी वडिलांना अटक

ओम पुरी यांचे बालपण मात्र अत्यंत वंचित आणि गरिबीत गेले. मीडिया रिपोर्ट्स नुसार, ओम पुरी अवघ्या सहा वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांना सिमेंट चोरल्याप्रकरणी तुरुंगात टाकण्यात आले होते. या घटनेनंतर ओम पुरी यांचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले. इतकेच नाही तर, त्यांना राहते घर देखील सोडावे लागले. त्या बाल वयात त्यांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी एक चहाच्या टपरीवर भांडी धुण्याचे काम करावे लागले होते.

नसिरुद्दीन शाह यांच्याशी झाली मैत्री

कुटुंबाची जबाबदारी असल्यामुळे ओम पुरी यांचे शिक्षणाकडे दुर्लक्ष झाले होते. अभिनयाची आवड असणाऱ्या ओम पुरी यांनी कसेबसे शिक्षण पूर्ण करून नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेतला. येथेच ओम पुरी आणि नसीरुद्दीन शाह यांची मैत्री झाली. ओम पुरी यांनी अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले. यात 'अर्ध सत्य', 'आरोहण', 'द्रोह काल', 'आक्रोश', 'माचीस' आणि 'आघात' इत्यादी चित्रपटांचा समावेश आहे. ओम पुरी जेव्हा एनएसडीमध्ये शिकत होते, तेव्हा त्यांची शबाना आझमीशी भेट झाली होती. त्यावेळी शबाना यांनी ओम पुरी यांच्या लूकवर अशी टिप्पणी केली होती, ज्यामुळे त्यांना खूप वाईट वाटले होते.
वाचा: पहिले लग्न मग ४ वर्षात घटस्फोट, दादा कोंडके यांच्या पत्नीविषयी माहिती आहे का?

पत्नीचा मोठा खुलासा

मीडिया रिपोर्ट्सनुसार, शबानाने ओम पुरी यांना पाहिले आणि म्हटले होते की, असे लोक कसे अभिनेता बनतात?. मात्र, नंतर दोघांनी 'धारावी', 'मृत्युदंड', 'अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यूं आता है', 'सिटी ऑफ जॉय' यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. आपल्या जबरदस्त अभिनयामुळे प्रसिद्धीझोतात आलेले ओम पुरी आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत राहिले होते. ओम पुरी यांची पत्नी नंदिता हिने २००९मध्ये अभिनेत्याच्या चरित्र 'अनलाइकली हीरो - ओम पुरी'मध्ये अभिनेत्याबद्दल मोठा खुलासा केला होता. बायोग्राफीमुळे अभिनेत्याच्या वैयक्तिक आयुष्यातही खूप मोठं वादळ आलं. अखेर २०१३मध्ये ओम पुरी आणि नंदिता यांचा घटस्फोट झाला. ओम पुरी यांचा २०१७मध्ये ब्रेन हॅमरेजमुळे मृत्यू झाला. त्यांच्या अचानक जाण्याने सर्वांनाच धक्का बसला होता.

Whats_app_banner