Nushrratt Bharuccha: आम्ही बेसमेंटमध्ये लपलो होतो; इस्राइलहून परत येताच नुसरतने दिली प्रतिक्रिया
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Nushrratt Bharuccha: आम्ही बेसमेंटमध्ये लपलो होतो; इस्राइलहून परत येताच नुसरतने दिली प्रतिक्रिया

Nushrratt Bharuccha: आम्ही बेसमेंटमध्ये लपलो होतो; इस्राइलहून परत येताच नुसरतने दिली प्रतिक्रिया

Aarti Vilas Borade HT Marathi
Updated Oct 10, 2023 07:33 PM IST

Nushrratt Bharuccha Stuck in Israel: ‘सोनू के टिटू की स्वीटी’ फेम अभिनेत्री नुसरत भरुचा एका इव्हेंटसाठी इस्राइलला गेली. तिथे तिला कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागला हे तिने भारताच आल्यावर सांगितले आहे.

Nushrratt Bharuccha
Nushrratt Bharuccha

हमास या दहशतवादी संघटनेने इस्राइलवर केलेल्या हल्ल्यामुळे सारे जग हादरले आहे. हमासकडून एकाचवेळी तब्बल ५ हजार रॉकेट्स इस्रायलवर डागण्यात आले. या घटनेनंतर इस्रायल सरकारने अवघ्या काही तासांत युद्धाची घोषणा केली. गेल्या कित्येक वर्षांमध्ये इस्रायलच्या भूमीवर करण्यात आलेला हा सर्वात मोठा हल्ला मानला जात आहे. याच दरम्यान, ‘सोनू के टिटू की स्वीटी’ फेम अभिनेत्री नुसरत भरुचा एका इव्हेंटसाठी इस्राइलला गेली होती. इस्राइल आणि हमास यांच्यामध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे नुसरत इस्राइलमध्ये अडकली होती. आता ती भारतात आली असून तिने तेथे काय घडले याबाबत माहिती दिली आहे.

नुसरतने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने इस्राइलमध्ये सध्या काय परिस्थिती आहे, तिला कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागला हे सांगितले आहे. जेव्हा इस्राइलवर हल्ला झाला तेव्हा ती हॉटेलमध्ये होती. सर्वांचा जीव वाचवण्यासाठी त्यांना बेसमेंटमध्ये नेण्यात आले. हे सगळं पाहून नुसरत खूप घाबरली होती.
वाचा: इस्राइलशी संबंधित 'या' ५ सीरिज आणि सिनेमा पाहून येईल डोळ्यांत पाणी

'मी सगळ्यांचे आभार मानू इच्छिते. मी भारतात सुखरुप परत यावे यासाठी तुम्ही सर्वजण प्रार्थना करत होतात. मी आता घरी पोहोचले आहे. सुरक्षित आहे. दोन दिवसांपूर्वी जेव्हा मी हॉटेलमध्ये होते तेव्हा अचानक मोठा आवाज झाला. त्या भागात सायरन वाजला लागले. आम्हाला सगळ्यांना तातडीने बेसमेंटमध्ये घेऊन जाण्यात आले' असे नुसरत म्हणाली.

पुढे ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानत म्हणाली की, 'मी अशा परिस्थितीचा यापूर्वी कधीही सामना केला नव्हता. पण आज जेव्हा मी माझ्या घरात सकाळी झोपून उठले तेव्हा मला ही गोष्ट प्रकर्षाने जाणवली की आपण भारतासारख्या सुरक्षित देशात राहतो आहोत, आपण खरंच खूप नशीबवान आहोत. याचसाठी मी आपल्या देशाच्या सरकारचे, भारतीय तसेच इस्रायल दूतावासाचे आभार मानते, त्यांनी योग्य मार्गदर्शन केल्याने मी आज सुखरूप माझ्या देशात परतले. जे लोक युद्धात अजूनही अडकले आहेत त्यांच्यासाठी मी प्रार्थना करते व लवकरच शांती प्रस्थापित होईल अशी आशा करते.'

अभिनेत्री नुसरत भरुचाच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तिने ‘प्यार का पंचनामा’, ‘छोरी’, ‘छलांग’, ‘राम सेतू’, ‘सेल्फी’ आणि ‘तू झुठी मैं मक्कार’ या सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Whats_app_banner