बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन केवळ तिच्या दमदार अभिनयासाठीच नाही तर तिच्या सौंदर्यासाठीही विशेष ओळखली जाते. ऐश्वर्याने बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंतच्या चित्रपटांमध्ये आपल्या जबरदस्त अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ती नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. ऐश्वर्या चित्रपटसृष्टीपासून लांब असून सध्या काय करते असा प्रश्न सर्वांना पडला होता? स्वत: ऐश्वर्याने याविषयी सांगितले आहे.
बुधवारी दुबईत ग्लोबल वुमन्स फोरमचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात ऐश्वर्याला पाहुणी म्हणून बोलावण्यात आले होते. त्यावेळी तिने भाषण दिले. या भाषणात ऐश्वर्याने ती चित्रपटांव्यतिरिक्त काय करते हे सांगितले आहे. समाजात बदल घडवून आणण्यासाठी, समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि जगभरातील महिलांसाठी नवीन संधी निर्माण करण्यासाठी आम्ही एकाच विषयावर आवाज उठवण्यासाठी एकत्र आले आहे असे ऐश्वर्या म्हणाली.
ऐश्वर्या म्हणाली की, ती कॅन्सर पेशंट एड असोसिएशनसोबत जनजागृती, मदत आणि निधी गोळा करण्यासाठी गेली अनेक वर्षे काम करत आहे. स्माईल ट्रेन नावाच्या संस्थेशी संबंधित असल्याचेही ऐश्वर्याने सांगितले. ही संस्था मुलांना मोफत क्लेफ्ट सर्जरी देते. ऐश्वर्याचे दिवंगत वडील कृष्णराज राय हेही 'स्माइल ट्रेन'शी जोडले गेले होते. त्यांच्या निधनानंतर 'स्माइल ट्रेन'तर्फे दरवर्षी त्यांच्या वाढदिवसाला स्माईल डे साजरा केला जातो. या दिवशी ऐश्वर्या 'स्माइल ट्रेन'ने उपचार घेतलेल्या मुलांना भेटते आणि त्यांच्यासोबत वेळ घालवते.
वाचा: 'करण-अर्जुन'मधील बिंदिया सध्या काय करते? १९९३ साली टॉपलेस फोटोशूटमुळे होती चर्चेत
या कार्यक्रमातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. कार्यक्रमातील ऐश्वर्याच्या लूकने सर्वांना घायाळ केले होते. तसेच या कार्यक्रमात जेव्हा ती स्टेजवर पोहोचली तेव्हा तिच्या मागे स्क्रीनवर तिचं नाव आलं, जे पाहून चाहते थक्क झाले. तिच्या नावापुढे म्हणजेच ऐश्वर्या रायच्या पुढे 'बच्चन' आडनाव मिस होतं. तेवढ्यात नेटकऱ्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या नात्यातील दुरावा यावर भाष्य करण्यास सुरुवात केली आहे. अनेकांनी वेगवेगळे अनुमान लावण्यास सुरुवात केली आहे.