Naseeruddin Shah: बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते नसीरुद्दीन शाह हे त्यांच्या बिनधास्त आणि बेधडक वक्तव्यासाठी विशेष ओळखले जातात. ते सध्या इंडस्ट्रीपासून लांब असले तरी त्यांच्या वक्तव्यामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसतात. नुकताच त्यांनी एका मुलाखतीमध्ये बॉलिवूडवर निशाणा साधला आहे. "हिंदी सिनेसृष्टीत काहीतरी उत्तम तेव्हाच घडू शकेल तेव्हा पैसे कमावण्यासाठी चित्रपट बनणे बंद होतील" असे नसीरुद्दीन शाह यांनी म्हटले आहे.
नसीरुद्दीन शाह यांनी नुकताच दिल्लीमध्ये पार पडलेल्या ‘मीर की दिल्ली, शाहजहांनाबाद : द इवॉल्विंग सिटी’ या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमात त्यांनी बॉलिवूड चित्रपटांविषयी वक्तव्य केले. “हिंदी चित्रपट निर्माते गेल्या १०० वर्षांपासून एकाच प्रकारचे चित्रपट बनवत आहेत. हे वास्तव पाहून माझी खूप निराशा होते. हिंदी सिनेसृष्टी १०० वर्षे जुनी असल्याचे आपण गर्वाने सांगतो, पण आपण सतत एकाच प्रकारचे चित्रपट बनवतोय, हे वास्तव आहे. म्हणूनच मी हिंदी चित्रपट पाहणे बंद केले आहे. मला ते अजिबात आवडत नाहीत. हिंदुस्तानी जेवणाला प्रत्येक ठिकाणी पसंत केले जाते, कारण त्यात दम आहे. पण हिंदी चित्रपटांमध्ये दम का नाही? जगभरातील प्रेक्षक भारतीय हिंदी चित्रपट पाहतात, कारण त्यांना आपल्या घराशी जोडल्याची भावना निर्माण होते. मात्र लवकरच लोकांना या गोष्टीचा वीट येईल” असे वादग्रस्त वक्तव्य नसीरुद्दीन शाह यांनी केले आहे.
वाचा: मी लक्षाच्या एका शब्दावर...; लक्ष्मीकांत बेर्डेंच्या आठवणीत वर्षा उसगावकर भावूक
पुढे नसीरुद्दीन यांनी निर्माते हे केवळ पैसे कमावण्याच्या हेतूने चित्रपट बनवतात असे म्हटले आहे. “हिंदी चित्रपटांसाठी तेव्हाच थोडीफार आशा निर्माण होईल जेव्हा ते फक्त पैसे कमावण्याच्या उद्देशाने चित्रपट बनवणे बंद करतील. चित्रपट म्हणजे केवळ पैसे कमावण्याचे साधन आहे, या दृष्टीकोनातून पाहणे ते बंद करतील. पण मला असे वाटते की आता खूप उशीर झाला आहे. यावर आता काही उपाय नाही कारण ज्या चित्रपटांना हजारो लोक पाहतात तसे चित्रपट बनत राहतील आणि लोक त्याला बनवत राहतील. त्यामुळे ज्या लोकांना गंभीर मुद्द्यांवर चित्रपट बनवायचे असेल, त्यांची ही जबाबदारी आहे की त्यांनी वास्तविकता दाखवावी आणि ती अशा पद्धतीने दाखवावी की बदल्यात त्यांना कोट्यवधी रुपये मिळू नये किंवा ईडी त्यांचे दार ठोठवू नये” असे नसीरुद्दीन म्हणाले.