Nivedita Saraf: 'लक्ष्याची खूप आठवण आली', लक्ष्मीकांत बेर्डेंच्या लेकाचं नाटक पाहून निवेदिता सराफ झाल्या भावूक
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Nivedita Saraf: 'लक्ष्याची खूप आठवण आली', लक्ष्मीकांत बेर्डेंच्या लेकाचं नाटक पाहून निवेदिता सराफ झाल्या भावूक

Nivedita Saraf: 'लक्ष्याची खूप आठवण आली', लक्ष्मीकांत बेर्डेंच्या लेकाचं नाटक पाहून निवेदिता सराफ झाल्या भावूक

Aarti Vilas Borade HT Marathi
Published Jul 15, 2024 09:50 AM IST

Nivedita Saraf Post: अभिनेत्री निवेदीता सराफने सोशल मीडियावर लक्ष्मीकांत बेर्डेचा लेक अभिनयसोबत फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्या भावूक झाल्या आहेत.

Nivedita Saraf Shared Photo
Nivedita Saraf Shared Photo

मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणून निवेदीता सराफ ओळखल्या जातात. त्यांनी एकेकाळी संपूर्ण इंडस्ट्री गाजवली होती. त्यांचा प्रत्येक चित्रपट जवळपास सुपरहिट ठरला होता. आता निवेदीता या सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळत आहे. नुकताच निवेदीता यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

निवेदीता यांनी केले अभिनयचे कौतुक

निवेदीता सराफ या नुकताच ‘आज्जी बाई जोरात’ हे नाटक पाहायला गेल्या होत्या. या नाटकात लक्ष्मीकांत बेर्डे यांचा लेक अभिनय बेर्डे महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. नाटक संपल्यानंतर निवेदिता सराफ यांनी अभिनयची भेट घेतली आणि या नाटकातील त्याच्या कामाचं निवेदिता सराफ यांनी कौतुक केलं. हा क्षण कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आणि हा फोटो निवेदिता यांनी इन्स्टाग्रामवर शेअर करत अभिनयाला शुभेच्छा दिल्यात. आज लक्ष्याची खूप आठवण आली. त्याला खूप अभिमान वाटला असता नक्कीच…, असं निवेदिता सराफ यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

काय आहे निवेदीता यांची पोस्ट?

निवेदीता यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवर अभिनयसोबतचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत, "‘आज्जीबाई जोरात’ हे नाटक बघायचा योग आला. नाटक खूप छान आहे. निर्मिती सावंत, पुष्कर श्रोत्री, मुग्धा गोडबोले, जयवंत वाडकर सगळ्यांनी खूप उत्तम कामं केली आहेत. लेखक दिग्दर्शक क्षितिज पटवर्धनचंही खूप कौतुक… पण सगळ्यात सुखद धक्का बसला तो अभिनय बेर्डेचे काम बघून… अभिनयने अप्रतिम काम केलंय. माझ्या बालमित्राची आमच्या लक्ष्याची खूप आठवण आली. त्याला खूप अभिमान वाटला असता नक्कीच…"

अभिनयने मानले आभार

अभिनयने निवेदीता यांची ही पोस्ट पाहिली. या पोस्टवर त्याने कमेंट करत निवेदीता यांचे आभार मानले आहेत. इतर नेटकऱ्यांनीही या पोस्टवर कमेंट करत अभिनयच्या कामाचे कौतुक केले आहे. सध्या सोशल मीडियावर निवेदीता यांची ही पोस्ट व्हायरल झाली आहे.
वाचा: दीपिका पादूकोणला मिठी मारताच ऐश्वर्याचे डोळे का पाणावले? नेमकं काय झालय?

लक्ष्मीकांत बेर्डे आणि निवेदीता यांनी केले एकत्र काम

अशोक सराफ, निवेदीता सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया बेर्डे या चौघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. या चौघांची मैत्री सर्वांनाच माहिती होती. पण २००४ साली लक्ष्मीकांत बेर्डेचे निधन झाले. आता त्यांचा लेक अभिनय सिनेसृष्टीत काम करत असल्यामुळे सर्वजण खूश आहेत. तो ‘आज्जी बाई जोरात’ या नाटकात काम करत आहे.

Whats_app_banner