Nivedita Saraf: निवेदिता-अशोक सराफ यांच्या लग्नाला होता कुटुंबियांचा विरोध! कशी जुळली रेशीमगाठ? वाचा...
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Nivedita Saraf: निवेदिता-अशोक सराफ यांच्या लग्नाला होता कुटुंबियांचा विरोध! कशी जुळली रेशीमगाठ? वाचा...

Nivedita Saraf: निवेदिता-अशोक सराफ यांच्या लग्नाला होता कुटुंबियांचा विरोध! कशी जुळली रेशीमगाठ? वाचा...

Published Jan 10, 2025 10:01 AM IST

Nivedita Saraf Birthday : अशोक सराफ आणि निवेदिता यांच्यात १८ वर्षांचे मोठे अंतर आहे. मात्र, त्यांच्यातील प्रेम नेहमीच फुलताना पाहायला मिळालं.

निवेदिता-अशोक सराफ यांच्या लग्नाला होता कुटुंबियांचा विरोध! कशी जुळली रेशीमगाठ?
निवेदिता-अशोक सराफ यांच्या लग्नाला होता कुटुंबियांचा विरोध! कशी जुळली रेशीमगाठ?

Nivedita Saraf Birthday Special : मालिका, चित्रपट असो वा नाटक आपल्या दमदार भूमिकांनी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करणाऱ्या अभिनेत्री निवेदिता सराफ यांचा आज (१० जानेवारी) वाढदिवस आहे. निवेदिता सराफ यांनी आजवरच्या कारकिर्दीत अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. निवेदिता सराफ आणि अशोक सराफ या जोडीने एकेकाळी मनोरंजन विश्व दणाणून सोडलं होतं. खऱ्या आयुष्यातही हे दोघे एकमेकांचे साथीदार आहेत. दोघांच्या वयात तब्बल १८ वर्षांचं अंतर असताना देखील, त्यांच्यातील प्रेम नेहमीच फुलताना पाहायला मिळालं. मात्र, सुरुवातीला त्यांच्या या नात्याला कुटुंबाकडून विरोध झाला होता.

अशोक सराफ यांचा जन्म ४ जून १९४७ रोजी झाला, तर निवेदिता जोशी यांचा जन्म १० जानेवारी १९६५ साली झाला. अशोक सराफ आणि निवेदिता यांच्यात १८ वर्षांचे मोठे अंतर आहे. विशेष म्हणजे, १९७१ साली 'दोन्ही घरचा पाहुणा' हा अशोक सराफ यांचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्या वेळी अशोक सराफ यांचे वय २४ वर्षे होते, तर निवेदिता त्या वर्षी केवळ सहा वर्षांच्या होत्या.

कुठे झाली पहिली भेट?

दोघांच्या मुलाखती आणि त्यांच्या नात्याच्या सुरूवातीची गोष्टही खूपच खास आहे. अशोक सराफ आणि निवेदिता जोशी यांची पहिली भेट 'डार्लिंग डार्लिंग' या नाटकाच्या दरम्यान झाली. निवेदिता यांच्या वडिलांनी त्यांची ओळख अशोक सराफ यांच्याशी करून दिली होती. यानंतर, 'नवरी मिळे नवऱ्याला' या चित्रपटाच्या सेटवर दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली. त्यानंतर 'धुमधडाका' या चित्रपटाच्या सेटवर त्यांची प्रेमकहाणी फुलू लागली. या प्रेमाच्या नात्याला प्रारंभ झाला, मात्र त्यांना विवाहाच्या बाबतीत अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

Hrithik Roshan : बालपणी शाळेतही जायला घाबरायचा हृतिक रोशन! कशाची वाटायची भीती? वाचा किस्सा

लग्नाला झाला होता विरोध!

निवेदिता यांच्या घरातून या लग्नाला विरोध होता. त्यांच्या आईला सिनेसृष्टीतील व्यक्तीशी विवाह करणे पसंत नव्हते. परंतु, निवेदिता ठाम होत्या आणि त्यांनी आपल्या निर्णयावर ठाम राहण्याचा निर्णय घेतला. अखेर त्यांच्या घरच्यांचा विरोध मावळला आणि त्यांना या विवाहास मान्यता मिळाली. अशाप्रकारे निवेदिता यांचे नवे आयुष्य 'मिसेस अशोक सराफ' म्हणून सुरू झाले.

अशोक सराफ आणि निवेदिता जोशी यांचे लग्न गोव्यातील प्रसिद्ध मंगेश मंदिरात झाले. मंगेशी हे मंदिर गोव्यातील पणजी-फोंडा महामार्गावर फोंड्यापासून ७ किलोमीटर अंतरावर स्थित आहे. अशोक सराफ यांची गणपती आणि शंकरावर खूप मोठी आस्था आहे, आणि मंगेशी हे त्यांचे कुलदैवत आहे. यामुळे अशोक सराफ यांनी मंगेशी मंदिरातच विवाह करण्याचा निर्णय घेतला होता.

Whats_app_banner