Nita Ambani At Grandson's School: नीता अंबानी या नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतात. कधी त्यांची फॅशन तर कधी त्यांची ज्वेलरी, यामुळे त्या नेहमीच प्रसिद्धी झोतात असतात. नेहमी स्वतःची एक वेगळी बाजू दाखवणाऱ्या नीता अंबानी यावेळी मात्र प्रेमळ आजीच्या भूमिकेत शिरताना दिसल्या आहेत. त्यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नीता अंबानी यांनी नुकतीच नातू पृथ्वी अंबानी याच्या शाळेला भेट देऊन, त्याच्या वर्गमित्रांशी देखील संवाद साधला.
इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये नीता अंबानी चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या ग्रुपसोबत बसून, त्यांना गोष्टी वाचून दाखवताना दिसत आहेत. या फोटोमध्ये करीना कपूरचा मुलगा जहांगीर अर्थात जेह अली खान आणि पृथ्वीचे इतर क्लासमेट्स देखील दिसत आहे. एका फोटोत नीता अंबानी जमिनीवरील छोट्या खुर्चीवर बसून हसताना दिसणाऱ्या चिमुकल्या मुलांना 'पेपा पिग' हे पुस्तक वाचून दाखवताना दिसत आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘गुरुवार, ३ ऑक्टोबर हा दिवस #NMAJS अर्ली इयर्स कॅम्पससाठी खूप खास होता. कारण आम्हाला आमच्या चेअरमन श्रीमती नीता अंबानी यांनी अचानक भेट दिली.’
चिमुकल्यांच्या गराड्यात अडकलेल्या नीता अंबानी त्यांना खेळणी दिली. तर, त्यांच्या आर्ट अँड क्राफ्ट प्रोजेक्टमध्ये त्यांना मदत केली. सर्वजण एकत्र जेवायला बसलेले असताना, नीता अंबानीही मुलांना जेवणाच्या टेबलावर जाऊन बसल्या.
पृथ्वी अंबानी हा अब्जाधीश मुकेश अंबानी यांचे चिरंजीव आकाश अंबानी आणि त्यांची पत्नी श्लोका मेहता यांचा मोठा मुलगा आणि अंबानी कुटुंबाचा मोठा नातू आहे. नुकतेच मुंबईतील वांद्रे येथील नीता मुकेश अंबानी ज्युनिअर स्कूलमध्ये (एनएमएजेएस) पृथ्वी अंबानी याचा प्रवेश झाला. त्याच्या शाळेचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
या व्हिडीओमध्ये पृथ्वी अंबानी त्याचे आई-वडील आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांच्यासोबत निळ्या रंगाच्या शाळेच्या गणवेशात शाळेच्या आवारात प्रवेश करताना दिसला होता. मुंबईतील वांद्रे येथे ३ लाख चौरस फूट जागेत ‘नीता मुकेश अंबानी ज्युनिअर स्कूल’ बांधण्यात आले आहे. ही संस्था प्राथमिक आणि माध्यमिक शालेय शिक्षणावर म्हणजेच इयत्ता पहिली ते सातवीवर लक्ष केंद्रित करते. तर ३०,००० चौरस फुटांमध्ये पसरलेला अर्ली इयर्स कॅम्पस प्री-स्कूल आणि बालवाडीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे.
अंबानी कुटुंबीय धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल (डीआयएस) चालवतात जे हायस्कूल म्हणजेच इयत्ता ८ वी ते १२ वीचे शिक्षण पुरवते. या तिन्ही संस्था मिळून एक हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना शिकवतात.
संबंधित बातम्या