Nishad Yusuf Death: मनोरंजन विश्वातून एक अत्यंत दु:खद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध चित्रपट संपादक निषाद युसूफ यांचे निधन झाले आहे. निषाद हे 'कंगुवा' या लोकप्रिय चित्रपटाचे एडिटर होते. वयाच्या अवघ्या ४३व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. धक्कादायक बाब म्हणजे त्यांचा अकस्मात मृत्यू झाला आणि त्यांच्या कोचीतील अपार्टमेंटमध्ये यांचा मृतदेह सापडला. निषाद बुधवारी मध्यरात्री २ वाजता त्यांच्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळून आले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
मात्र, त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, निषाद युसूफच्या मृत्यूला दुजोरा मिळाला आहे. केरळ फिल्म एम्प्लॉईज फेडरेशन (FEFKA) च्या संचालकांनी सोशल मीडियावर निषाद युसूफ यांच्या निधनाची माहिती दिली आहे. चित्रपट संपादक निषाद युसूफ सध्या आपल्या 'कंगुवा' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त होते. सूर्या अभिनीत या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ते संपूर्ण स्टारकास्टसोबत वेगवेगळ्या ठिकाणी जात होते. या चित्रपटात बॉबी देओल आणि दिशा पाटनी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
निषादचा ‘कंगुवा’ हा चित्रपट १४ नोव्हेंबरला थिएटरमध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. पण, रिलीजपूर्वीच ही दुःखद घटना घडली आहे. निषाद युसूफ यांच्या आकस्मिक निधनाने चित्रपटाच्या संपूर्ण टीमला धक्का बसला असून, चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य समोर आलेले नाही. मात्र, निषाद युसूफला काय झाले? त्याचा मृत्यू कसा झाला? त्याबाबतही कोणताही खुलासा अद्याप झालेला नाही. हे आत्महत्येचे प्रकरण असू शकते, असा दावा मीडिया रिपोर्ट्स करत आहेत. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
निषाद युसूफ याच्या सोशल मीडियावर एक नजर फिरवली, तर लक्षात येते की, त्यांनी ३ दिवसांपूर्वी शेवटची सोशल मीडिया पोस्ट शेअर केली होती. निषाद यांनी एक फोटो पोस्ट केला होता, ज्यामध्ये ते अभिनेता सूर्यासोबत पोज देत होते. त्याच दिवशी त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवरून आणखी एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये ते सूर्या आणि बॉबी देओलसोबत दिसले होते. त्यांचे हे फोटो चित्रपटाच्या प्रमोशनल इव्हेंटमधील आहेत. या फोटोत चित्रपटाचे पोस्टर आणि त्यांच्या मागे मोठा जनसमुदाय दिसत आहे.
संबंधित बातम्या