छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ हा काहीच दिवसांपूर्वी ऑफ-एअर गेला आहे. मात्र, अजूनही या कार्यक्रमाची जोरदार चर्चा पाहायला मिळते. ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाचा ‘कॅप्टन ऑफ द शिप’ म्हणजेच अभिनेता-निर्माता-दिग्दर्शक आणि लेखक निलेश साबळे याने या कार्यक्रमातून काढता पाय घेतला होता. आपल्या तब्येतीचं कारण देत काही दिवसांसाठी ब्रेक घेत असल्याचं, त्याने चाहत्यांना सांगितलं होतं. मात्र, यानंतर काहीच दिवसात एका नवीन शोची घोषणा करत निलेश साबळेने सगळ्यांनाच मोठा धक्का दिला. निलेश साबळे लवकरच त्याचा ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ या नावाचा एक कार्यक्रम घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या कार्यक्रमात निलेश साबळेसोबत अभिनेता भाऊ कदम आणि ओमकार भोजने हे देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. या निमित्ताने निलेश साबळेने एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला पुन्हा ‘चला हवा येऊ द्या’मध्ये दिसणार का असा प्रश्न विचारला गेला. ‘चला हवा येऊ द्या’ हा शो काहीच दिवसांपूर्वी बंद झाला असला, तरी सप्टेंबर महिन्याच्या आसपास तो पुन्हा एकदा सुरू होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर निलेश साबळेला या कार्यक्रमासंदर्भात प्रश्न विचारला गेला. मात्र, मी ‘चला हवा येऊ द्या’मधून पूर्णपणे बाहेर पडलो असून, आता पुन्हा तो कार्यक्रम सुरू झाला, तरी मी त्यात नसणार, हे निलेश साबळेने स्पष्ट केले आहे.
‘मी कार्यक्रम सोडला आहे. पुन्हा परतणार नाही’, असं म्हणत निलेशने ‘चला हवा येऊ द्या’चा विषयच कट केला. गेली दहा वर्ष प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करणारा ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रम बंद झाल्यावर चाहते देखील नाराज झाले होते. आता हा कार्यक्रम परत सुरू झाला, तर त्यात निलेश साबळे दिसेल का? असा प्रश्नच हा त्यांच्या मनात होता. मात्र, हा कार्यक्रम परत प्रेक्षकांच्या भेटीला आला तरी मी त्यात काम करणार नाही, असं म्हणत निलेश साबळेने या मागचे कारण देखील सांगितले. यावेळी तो म्हणाला की, ‘एखादी गोष्ट आपण जेव्हा सतत करतो, तेव्हा त्याचा कंटाळा येतो. म्हणजे एखादा चित्रपटाचा पहिला पार्ट आला, तर प्रेक्षक त्याच्यावर भरभरून प्रेम करतील. त्याचा दुसरा पार्ट आला तरीही त्याला प्रतिसाद देतील. मात्र, तिसरा आणि चौथा पार्ट आला तर ते त्याच्याकडे ढुंकूनही बघणार नाहीत. त्यामुळे पुन्हा पुन्हा त्याच भूमिकेत दिसण्याचा आता मलाही कंटाळा आलाय आणि माझे प्रेक्षकही यामुळे कंटाळतील आणि म्हणूनच मी पुन्हा चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम करणार नाही.’
‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाबद्दल सांगताना निलेश म्हणाला की, चॅनलकडून त्यांना सांगितले गेले होते की, जानेवारीमध्ये हा कार्यक्रम बंद होईल. मात्र, ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा तो सुरू केला जाईल. पण, आता पुढे काय होणार, याची मला काहीच कल्पना नाही. अर्थात निलेश साबळेसाठी ‘चला हवा येऊ द्या’ हा विषय आता पूर्णपणे बंद झाला आहे. आता तो ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ या कलर्स मराठी वाहिनीवरील विनोदी कार्यक्रमातून प्रेक्षकांना भेटणार आहे.