अमेरिकन पॉप गायक आणि अभिनेत्री प्रियांका चोप्राचा पती निक जोनास हा ग्लोबल आयकॉन बनला आहे. मात्र, आता त्याच्या प्रकृतीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. निक जोनास हा 'इन्फ्लुएंझा-ए' नावाच्या आजाराने त्रस्त आहे. काल त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर करून त्याच्या चाहत्यांना या आजाराची माहिती दिली. या व्हिडीओमध्ये निक जोनासचा लाल चेहरा आणि सुजलेले डोळे पाहून चाहतेही काळजीत पडले आहेत. तसेच, चाहते त्याला लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देत आहेत.
निक जोनास याने ३ मे रोजी त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने त्याच्या चाहत्यांना सांगितले की, त्याला इन्फ्लूएंझा-ए नावाच्या आजाराने ग्रासले आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताना, गायक निक जोनास म्हणाला की, 'आज तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी माझ्याकडे कोणतीही चांगली बातमी नाही. काही दिवसांपासून मला खूप अस्वस्थ वाटत होते. मला माझी तब्येत ठीक नाही असे वाटत होते. यानंतर मी झोपून उठलो तर, माझा आवाज विचित्र झाला होता. मला माझ्या चाहत्यांना निराश करणे आवडत नाही. पण, सध्या मला माझ्या तब्येतीवर लक्ष केंद्रित करावे लागेल.’
आपला हा व्हिडीओ पोस्ट करत निक जोनासने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'नमस्कार मित्रांनो... मला इन्फ्लूएंझा-ए नावाच्या आजाराने ग्रासले आहे. हा आजार सर्वत्र पसरत आहे. मी सध्या गाण्यासाठी अजिबातच ठीक नाही. मी माझ्या शोसाठी स्वतःला तयार करत होतो. मी माझ्या चाहत्यांसाठी खूप तयारी केली होती. पण, आता असे दिसते आहे की, मी मेक्सिकोमधील शोसाठी शारीरिकदृष्ट्या तयार नाही.’ निकने पुढे खुलासा केला की, त्याचा शो आता ऑगस्टमध्ये शेड्यूल करण्यात आला आहे. यासोबतच गायकाने मेक्सिको सिटीमध्ये होणाऱ्या शोच्या बदललेल्या तारखा: ८/२१ आणि ८/२२, मॉन्टेरी: ८/२४ आणि ८/२५ या देखील सांगितल्या आहेत. तसेच, लोकांना झालेल्या गैरसोयीबद्दल क्षमस्व असल्याचे म्हटले आहे.
निक जोनासच्या आजाराबद्दल कळताच चाहते देखील काजळीत पडले आहेत. सगळेच सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला बरे वाटावे म्हणून प्रार्थना करताना दिसत आहेत. यावेळी निकने चाहत्यांचे आभार मानताना म्हटले की, 'तुमच्या या प्रेमाबद्दल धन्यवाद. तुम्ही सगळेच जगातील सर्वोत्तम चाहते आहात.’ निक जोनास त्याच्या चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे. पण, प्रियांका चोप्रासोबत लग्न केल्यानंतर त्याला ‘नॅशनल जीजू’चा टॅग मिळाला आहे. दरम्यान, त्याच्या आजारपणामुळे भारतीय चाहतेही चिंतेत आहेत. तसेच, या व्हिडीओवर कमेंट करत, ते प्रार्थना करत आहेत.